नवी दिल्ली, 15 डिसेंबर : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी झाली. केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी राज्य सरकारने केली होती मात्र, सुप्रीम कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निकाल म्हणजे महाराष्ट्र सरकारला एक मोठा झटका आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यात याव्यात असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यानुसार आता राज्यात या महिन्यात (डिसेंबरपर्यंत) होणाऱ्या निवडणुका या ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय होणार आहेत.
त्यानुसार आता या महिन्यात होणाऱ्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. म्हणजेच ओबीसीच्या जागा आता सर्वसाधारण प्रवर्गातून लढवल्या जाणार आहेत. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 17 जानेवारी रोजी होणार आहे.
इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी SC ने फेटाळली
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा राज्य सरकारला द्यावा अशी मागणी ठाकरे सरकारने केली होती. पण या डेटामध्ये अनेक त्रृटी असल्याने तो देता येणार नसल्याचं केद्राने म्हटलं होतं. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानेही केंद्र सरकारने दिलेली माहिती ग्राह्य धरली आणि महाराष्ट्र सरकारने केलेली मागणी फेटाळून लावली आहे. डेटामध्ये त्रृटी असल्याने आता नव्याने तो डेटा आरक्षणाच्या संदर्भातील निकष ठरवण्यासाठी वापरला जाऊ शकत नाही.
सुप्रीम कोर्टाने इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी फेटाळल्यामुळे आता राज्य सरकारला आपली स्वत:ची यंत्रणा वापरुनच डेटा गोळा करावा लागणार आहे.
वाचा : रुपाली पाटील यांचा मनसेला 'जय महाराष्ट्र', 'या' दोन नेत्यांवर केला गंभीर आरोप
सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने द्यावा अशी माघणी राज्य सरकारने केली.
मात्र, इम्पेरिकल डेटामध्ये त्रृटी असल्याने तो देता येणार नसल्याचं केंद्राने म्हटलं.
केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला.
मग सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली
छगन भुजबळांची प्रतिक्रिया
105 नगरपरिषदा 27 जिल्हा परिषद महापालिका निवडणुका येताय या निवडणुकांतील ओबीसींच्या जागा आता ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. आयोगाला 17 जानेवारीपर्यंत डेटा एकत्रित करण्याचा प्रयत्न असणार आहे. जलद गतीने आयोगाने काम करणं गरजेचं आहे. प्रशासनाकडून सहकार्य करावे, दिवसरात्र बसून हा डेटा गोळा करावा लागेल. सर्वांनी एकत्रित येऊन काम पुर्ण करावं असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reservation, Supreme court, महाराष्ट्र