AIRSTRIKE चा सर्वांत मोठा पुरावा : हवाई हल्ल्याच्या वेळी अ‍ॅक्टिव्हेट होते 300 मोबाईल

AIRSTRIKE चा सर्वांत मोठा पुरावा : हवाई हल्ल्याच्या वेळी अ‍ॅक्टिव्हेट होते 300 मोबाईल

एअर स्ट्राईक केले त्याच्या अगदी काही काळ आधी त्या तळांवर 300 मोबाईल फोन अॅक्टिव्ह असल्याची माहिती भारतीय गुप्तहेर खात्याच्या तांत्रिक विभागाकडे आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मार्च : भारतीय वायुदलाने पाकिस्तानात बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राईक केले त्याच्या अगदी काही काळ आधी त्या तळांवर 300 मोबाईल फोन अॅक्टिव्ह असल्याची माहिती भारतीय गुप्तहेर खात्याच्या तांत्रिक विभागाकडे आहे. याचा सरळ अर्थ असा की, किमान 300 जण या तळांवर एअर स्ट्राईकच्या वेळी उपस्थित होते.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातलं लक्ष्य निश्चित केल्यावर नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO)या संस्थेने खैबर पख्तुनख्वा प्रांतातल्या या तळांवर नजर ठेवायला सुरुवात केली होती, अशी माहिती एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली.

हल्ल्यापूर्वी अगदी काही काळापर्यंत इथल्या मोबाईलना सिग्नल होते. हल्ल्यानंतर ते नाहीसे झाले. याचाच अर्थ 300 अॅक्टिव्ह टार्गेट साध्य झाली, असा काढला येईल.

26 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मिराज2000 विमानं घुसवून एअर स्ट्राईक केले. जैश ए मोहम्मदचे तळ हे त्यांचं लक्ष्य होतं. पण या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार झाले किंवा किती नुकसान झालं याची आकडेवारी निश्चितपणे पुढे आलेली नाही. भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांना याविषयी विचारलं असता, त्यांनी ही आकडेवारी देणं भारतीय हवाईदलाचं काम नाही, सरकारचं आहे, असं सांगितलं. या माहितीला अद्याप सरकारकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

इटलीच्या पत्रकार फ्रेंचेस्का मॅरिनो यांचा दावा

फर्स्टपोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, इटलीच्या पत्रकार फ्रेंचेस्का मॅरिनो यांनी दावा केली आहे की, भारताने पाकिस्तानवर हल्ला केला, ज्यात अनेक दहशतवादी मारले गेले. फ्रेंचेस्का मॅरिनो यांनी एअर स्ट्राईक झालेल्या ठिकाणी स्थानिकांशी चर्चा केली आहे. यात समोर आलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारीला एअर स्ट्राईक झाल्यानंतर रुग्णवाहिकेतून 35 मृतदेह घेऊन जाण्यात आले होते. घटना घडताच काही स्थानिक घटनास्थळी गेले पण पाक लष्कराकडून त्यांचे मोबाईल घेण्यात आले अशीही माहिती समोर आली आहे.

Air Strikeमध्ये किती दहशतवादी मेले ते मोजणं आमचं काम नाही - वायुदल प्रमुख

भारतीय वायुदलानं पाकिस्तानविरोधात केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईसंदर्भात काँग्रेसचे नेते आणि शेजारील देश वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. Air Strike वर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना भारतीय वायुदलाचे प्रमुख बी.एस.धानोआ यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं. ' एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले, त्याची संख्या मोजणे वायुदलाचे काम नाही. आम्हाला जे टार्गेट दिले होतं, ते आम्ही पूर्ण केलं', असं बी.एस. धनोआ यांनी सांगितलं.

यावेळेस वायुदल प्रमख धानोआ यांनी पाकिस्तानला थेट इशारा देत म्हटलं की, 'कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देताना वायुदल क्षणाचाही विचार करणार नाही. गरज भासल्यास भारतीय वायुदल पुन्हा पाकिस्तानात घुसून कारवाई करेल. तसंच बॉम्ब जंगलात पडले नसते, तर पाकिस्तानने प्रतिहल्ला केला नसता.'

'हल्ल्यासाठी अपग्रेडेड मिग 21 विमान वापरलं'

वायुदल प्रमुख धनोआ यांनी पुढे असंही सांगितलं की, एअर स्ट्राईकदरम्यान वापरण्यात आलेलं मिग 21 हे अपग्रेडेड विमान होतं आणि शत्रू देशाला प्रत्युत्तर देण्याच्या वेळेस आमच्याकडे जे विमान उपलब्ध असेल, त्यावेळेस त्याचा वापर केला जाईल.

'पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे पुरावे'

भारतावर हल्ला करताना पाकिस्ताननं F-16 विमानांचा वापर केला. याचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत, या विमानाचे काही तुकडे आमच्याकडे आहेत, असे सांगत धानोआ यांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा चव्हाट्यावर आणला.

'अभिनंदन यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत'

वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे. जोपर्यंत ते ठीक होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू राहतील. अभिनंदन सर्वच चाचण्यांमध्ये यशस्वी झाल्यास ते लवकरच आपल्या पदावर पुन्हा रूजू होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

(ही बातमी अपडेट होत आहे. नवी माहिती मिळाल्यावर इथे दिली जाईल.)

VIDEO : AIRSTRIKE मध्ये राफेल असतं तर चित्र वेगळं असतं - नरेंद्र मोदी

First published: March 4, 2019, 9:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading