नवी दिल्ली 10 जून : भारताच्या दबावानंतर पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधले दहशतवादी तळ बंद केले असं वृत्त आलं होतं. त्यावर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. पाकिस्तान विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. त्यांनी तळ बंद केले किंवा नाही हे समजण्याचा काहीही मार्ग नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
रावत म्हणाले, अशा बातम्या आल्या असल्या तरी त्याची खात्री करणं कठीण आहे. आम्ही सीमेवरची कठोर निगराणी सुरूच ठेवू असंही त्यांनी सांगितलं. भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर प्रचंड दबाव वाढला होता. त्यानंतर जागतिक दबावही निर्माण झाला. त्यामुळे पाकिस्तानला कारवाई करणं भाग पडल्याचं बोललं जातंय.
Army Chief General Bipin Rawat on reports about Islamabad shutting down terror camps in Pakistan occupied Kashmir (PoK): No way to verify whether Pakistan has closed down terrorist camps or not. We will continue to maintain strict vigil along our borders. (File pic) pic.twitter.com/cbUC8Tzhrl
— ANI (@ANI) June 10, 2019
मात्र आत्तापर्यंतचा पाकिस्तानचा अनुभव हा वाईट असल्याचं त्यांच्यावर विश्वास ठेवायला नको असं मत संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. फक्त धुळफेक करण्यासाठीच पाकिस्तान तात्पुरत्या स्वरुपात अशा कारवाया करते मात्र नंतर दहशतवाद्यांना मोकळं रान मिळतं हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे भारताची कायम सावध भूमिका राहिली आहे.
शांतता चर्चा सुरू करण्यासाठी पाकिस्तान भारताकडे वारंवार विनवण्या करत आहे. मात्र दहशतवाद आणि शांतता चर्चा एकाच वेळी सुरू राहू शकत नाही असं भारताने ठामपणे सांगितलं होतं. दहशतवादाला खतपाणी देण्याचं पाकिस्तानने बंद केलं याची खात्री झाल्यावरच चर्चा पुन्हा सुरू होईल असं भारताने म्हटलं आहे.
त्यामुळे लष्कप्रमुख बिपीन रावत यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय. मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत केल्यानंतर पाकिस्तानवरचा दबाव आणखी वाढला आहे.