पटणा, 9 ऑगस्ट : महाराष्ट्रातल्या राजकीय भुकंपाला दोन महिने होत नाहीत तोच आता बिहारमध्येही (Bihar Politics) राजकीय भूकंप झाला आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे, तसंच ते एनडीएमधूनही बाहेर पडणार आहेत. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना भेटून नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांकडे राजीनामा देतानाच नितीश कुमार यांनी आमदारांच्या समर्थनाचं पत्रही राज्यपालांना दिलं आहे.
नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली असली तरी आता ते नव्या सत्तास्थापनेचा फॉर्म्युला काय असणार? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. बिहारमध्ये आरजेडीचे 79, जेडीयूचे 45, काँग्रेसचे 19, डाव्यांचे 16 आणि एक अपक्ष असं 160 चं संख्याबळ आहे. बिहारमध्ये 2020 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या, म्हणजेच विधानसभा बरखास्त झाली नाही तर पुढच्या निवडणुका 2025 साली होतील.
लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी हा 2020 च्या निवडणुकांमधला सगळ्यात मोठा पक्ष ठरला. आता सगळ्यात मोठा पक्ष असूनही आरजेडी 45 आमदार असलेल्या जेडीयूच्या नितीश कुमारांना साथ देणार आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपनेही हीच स्ट्रॅटेजी वापरून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं. उरलेल्या तीन वर्षांमध्ये सुरूवातीला नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद देऊन शेवटच्या दीड वर्षांमध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाणार का? अशीही चर्चा सुरू आहे. याचसोबत नितीश कुमार यांनी काँग्रेस, आरजेडी आणि डाव्यांना घेऊन सरकार बनवलं तर यात कोणत्या पक्षाला किती खाती मिळणार, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
बिहारचं पक्षीय बलाबल
2020 च्या निवडणुकीत 243 जागांच्या बिहार विधानसभेत एनडीएला 125 जागांवर काठाचं बहुमत मिळालं होतं. भाजपला 74 तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला 43 जागा, विकासशील इनसान पार्टीला 4 आणि हिंदूस्तान आवाम पार्टी सेक्युलरला 4 जागा मिळाल्या होत्या.
दुसरीकडे आरजेडी आणि त्यांच्या घटकपक्षांना 110 जागांवर यश मिळालं होतं. आरजेडी 75 जागांसह बिहारमधली सगळ्यात मोठी पार्टी ठरली. तर काँग्रेसला 19 जागा आणि डाव्यांना 16 जागा मिळाल्या. ओवेसींच्या एमआयएमचे 5 आमदारही बिहारमध्ये निवडून आले, यातले 4 आमदार आरजेडीमध्ये गेले.
आरजेडी आमदाराच्या मृत्यूमुळे बिहारच्या विधानसभेचं संख्याबळ सध्या 242 एवढं आहे. यात भाजपला 77, जेडीयूला 45, हिंदूस्तान आवाम पार्टी सेक्युलरला 4, आरजेडीला 79, काँग्रेसला 19, सीपीआयएम-एलला 12, सीपीआयला 4, एमआयएमला 1 आणि अपक्ष 1 अशा जागा मिळाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nitish kumar