मराठी बातम्या /बातम्या /देश /विरोधकांचं 'मिशन 2024', पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? शरद पवारांच्या भेटीनंतर नितीश कुमारांनी दिलं उत्तर

विरोधकांचं 'मिशन 2024', पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? शरद पवारांच्या भेटीनंतर नितीश कुमारांनी दिलं उत्तर

 Nitish Kumar Sharad Pawar meet

Nitish Kumar Sharad Pawar meet

दिल्ली दौऱ्यावर असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : बिहारमध्ये सुरू झालेल्या राजकीय बदलांचे परिणाम आता केंद्रातल्या राजकारणातही दिसू लागले आहेत. दिल्ली दौऱ्यावर असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. दिल्ली दौऱ्यावर असलेले नितीश कुमार कालपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यामध्ये राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सिताराम येचुरी, डी.राजा, शरद पवार यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

नितीश कुमार यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे केंद्रीय पातळीवर बनत असलेल्या नव्या समिकरणाला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे, पण 2024 साली विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांना हाच प्रश्न विचारण्यात आला, पण त्यांनी यावर थेट उत्तर द्यायचं टाळलं.

'आम्ही सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचा प्रयत्न सगळ्यांना एकाच मंचावर आणण्याचा आहे. मी विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा नाही. सगळे जण मिळून निश्चित करतील, तोच चेहरा असेल,' असं उत्तर नितीश कुमार यांनी दिलं आहे.

'राज्यांच्या विकासाबाबत शरद पवारांशी चर्चा झाली, त्यांनी आमच्या कामाचं समर्थन केलं. एकत्र लढलो तरच देशाचा विकास होऊ शकतो, हे त्यांनीही मान्य केलं', असं नितीश कुमार म्हणाले. 'केंद्रातली लोक सध्या काम करत नाहीयेत. एनडीएची लोक देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आमची सगळ्यांसोबत चर्चा सुरू आहे. गरज पडली तर एकत्र बसूनही चर्चा केली जाईल. सोनिया गांधी दिल्लीला परत येतील तेव्हा त्यांना भेटण्यासाठी परत येईन,' अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिली.

पवारांचा पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला नकार

काहीच दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान व्हायच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मी सध्या 82 वर्षांचा आहे, मोरारजी देसाई (Morarji Desai) देखील 82व्या वर्षी पंतप्रधान झाले होते, पण मी हा कित्ता गिरवणार नाही. मी कोणत्याही प्रकारे सत्तेत सहभागी होणार नाही, तसंच सत्तेची जबाबदारीही घेणार नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Nitish kumar