नवी दिल्ली 4 जानेवारी : लोकसभेत राफेल प्रकरणावर झालेल्या चर्चेला संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी शुक्रवारी उत्तर दिलं. आपल्या भाषणात त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. फक्त मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठीच काँग्रेस राफेल प्रकरण उकरून काढत असल्याचा आरोप त्यांनी केला. 90 च्या दशकात बोफोर्सने काँग्रेसची नाव बुडवली मात्र राफेल मोदींना पुन्हा सत्ता देईल असं त्यांनी सांगितलं.
या प्रकरणावर चर्चेची सुरूवात करताना राहुल गांधींनी निर्मला सीतारमण या चर्चेतून पळ काढत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्या काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आपल्या उत्तराच्या भाषणात त्या म्हणाल्या, "काँग्रेसने देशाच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं. देशाला लढाऊ विमानांची गरज असताना गेल्या 15 वर्षांपासून फक्त खेरदीची प्रक्रियाच सुरू आहे. पहिले संरक्षण व्यवहारात दलाली घेतली जात होती, गेल्या पाच वर्षांपासून दलालांचा पत्ता साफ झालाय."
"सुप्रीम कोर्टानं 36 विमाने घेण्याच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला नाही असं स्पष्ट केलं. तसच खरेदी प्रक्रियेत नियमांचं उल्लंघन झालं नाही. त्यामुळे संशय निर्माण होत नाही असंही म्हटलं होतं. असं असतानाही काँग्रेस अकारण आरोप करत आहे." अशी टीकाही त्यांनी केली.
सीतारामण यांच्या भाषणानंतर राहुल यांनी त्यांना उत्तर देण्यासाठी अध्यक्षांकडे वेळ मागितला आणि सुमित्रा महाजन यांनी त्यांना वेळही दिला.
काय म्हणाले राहुल गांधी?
राफेल घोटाळ्याचा माझा आरोप मनोहर पर्रिकर आणि निर्मला सीतारमण यांच्यावर नाही तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत सरकारवर हल्लाबोल केला आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी राफेलवर सरकारची भूमिका मांडल्यानंतर राहुल गांधींनी सरकारवर पलटवार केला.
राफेलचं कॉन्ट्रॅक्ट एचएएल या सरकारी कंपनीकडून काढून ते अनिल अंबानी यांना का देण्यात आलं, असा सवाल करत राहुल गांधींनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसंच आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची सरकारने उत्तरं दिलीच नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.