नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी (Nirbhaya Gang Rape and Murder) दोषी विनय शर्मानं (Vinay Sharma) पुन्हा एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. याआधी विनयनं भितींवर डोके आपटले होते, आता त्यानं स्टेपल पिन गिळण्याचा प्रयत्न केला. तुरूंगातील कर्मचाऱ्यांनी त्याला असे करण्यापासून रोकले. यानंतर तिहार जेलमधील अधिकाऱ्यांनी विनयला त्वरित रुग्णालयात दाखल केले. सध्या विनयवर उपचार सुरू आहे.
शनिवारी तुरूंगातील अधिकाऱ्यांनी विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर यांच्या कुटुंबीयांना नोटिसा पाठवल्या आणि त्यांना अखेरचे भेटण्यास सांगितले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश सिंह आणि पवन गुप्ता यांच्या कुटुंबातील सदस्यांसह 31 जानेवारी रोजी अखेरची बैठक झाली. तिहार कारागृहातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी अक्षय आणि विनय यांना विचारले की त्यांना कोणाला भेटायचे आहे? त्यानंतर त्याच्या घरच्यांनी या दोघांची भेट घेतली.
दोषींवर नजर ठेवली जात आहे
नवभारत टाईम्स डॉट कॉमच्या वृत्तानुसार, सर्व आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी झाल्यापासून विनयने अनेकवेळा हिंसक वर्तन केले आहे. त्यामुळे त्याच्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. मात्र तुरूंगात विनयची शारीरिक व मानसिक स्थिती स्थिर असल्याचे जेल अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात फाशी झालेल्या चार दोषींवर चोवीस तास नजर ठेवली जात आहे आणि अधिकारी सतत सीसीटीव्हीद्वारे त्यांचे निरीक्षण करत आहेत.
नवीन डेथ वॉरंटनंतर विनयचे वागणे बदलले
सूत्रांनी सांगितले की, हे चारही दोषी (मुकेश, अक्षय, विनय आणि पवन गुलाब) आधी व्यवस्थित जेवत होते. मात्र आता त्यांनी जेवण सोडले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून चारही आरोपींचे खाणे कमी झाले आहे. 1 मार्च रोजी पटियाला न्यायालयाच्या वतीनं नवीन डेथ वॉरंट जारी केले आहे.
चारही नराधमांना 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फासावर लटकावणार
संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया गँगरेप प्रकणातील चारही नराधमांना 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे. पटियाला हाऊस कोर्टाने (Patiala House Court) चारही नराधमांच्या फाशीच्या मुहुर्तावर शिक्का मोर्तब केला आहे. कोर्टात आरोपींविरोधात नवं डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. दोषी पवनला कोर्टाने दिलेल्या नव्या वकीलांकडून पहिल्यांदा पवनची बाजू मांडली. मात्र, कोर्टाने ती फेटाळून लावत नवं डेथ वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने आतापर्यंत जारी केलेले हे तिसरे डेथ वॉरंट आहे.