Nirbhaya Case : 2651 दिवसांनंतर निर्भयाला अखेर न्याय मिळाला, चारही नराधमांना दिली फाशी

Nirbhaya Case : 2651 दिवसांनंतर निर्भयाला अखेर न्याय मिळाला, चारही नराधमांना दिली फाशी

दोषी चारही नराधमांना जल्लाद पवननं सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी फाशी दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मार्च : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी अखेर 7 वर्ष 3 महिन्यांनंतर न्याय मिळाला आहे. दोषी चारही नराधमांना जल्लाद पवननं सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी फासावर लटकवलं. 2012 रोजी दिल्लीतील निर्भयावर क्रूरपणे बलात्कार करून हत्या करणाऱ्या पापी नराधमांचा अखेर अंत झाला आणि निर्भयाला उशिरा का होईना न्यायव्यवस्थेनं न्याय दिला. नराधमांनी 7 वर्षांमध्ये सर्व पळवाटांचा अवलंब करत फाशी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला मात्र सगळे प्रयत्न अपयशी ठरले. नराधमांना फाशी दिल्यानंतर तिहार जेलबाहेर नागरिकांनी तिरंगा फडकवून निर्भयाला न्याय दिल्याचा समाधान व्यक्त केलं.

आजचा दिवस निर्भायाचा आहे. संपूर्ण देश हा दिवस विसरणार नाही. उशिरा का होईना निर्भयाला अखेर न्याय मिळाला. त्यामुळे मी न्यायव्यवस्था आणि संविधानाचे आभार मानते. मी माझ्या मुलीला वाचवू शकले नाही पण न्याय देऊ शकले याचं समाधान आहे. नराधमांनी फाशी टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र न्यायव्यवस्थेनं त्यांना योग्य ती शिक्षा दिली. उशीर झाला खरा पण आजच्या या घटनेमुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास कायम राहिल. आपल्याला योग्य न्याय मिळेल हा विश्वास त्यांच्या मनात आज पक्क होईल अशी प्रतिक्रिया नराधमांना फाशी दिल्यानंतर निर्भयाची आई आशा देवी यांनी दिली आहे. तर निर्भयाच्या वडिलांनी आम्ही निर्भयाला वाचवू शकलो नाही याचं दु:ख सलत असल्याची भावना व्यक्त केली मात्र तरीही आज न्याय व्यवस्थेनं योग्य न्याय दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचा-निर्भयाच्या चारही आरोपींचा शेवटचा अर्धा तास, वाचा काय झालं तिहार जेलमध्ये...

नराधमांना फाशी दिल्यानंतर सर्व स्तरातून निर्भयाला आज श्रद्धांजली वाहिली जात आहे. 7 वर्षांसाठी सुरू असलेला हा न्यायाचा लढा आज अखेर संपला असला तरीही अजून अशा अनेक निर्भयांसाठी लढायचं आहे असंही निर्भयाच्या आईनं सांगितलं आहे. जल्लाद पवननं चारही नराधमांना सकाळी 5.30 वाजता फाशी दिली आणि त्यानंतर 30 मिनिटं त्यांना फासावरच लटकवण्यात आलं होतं. त्यावेळी तिथे जल्लाद वगळता आणखी 4 जणच उपस्थित होते. त्यानंतर डॉक्टरांच्या टीमनं 6 वाजता त्यांना मृत घोषित केलं. पुढची प्रक्रिया पूर्ण करून दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात त्यांचे मृतदेह सकाळी 8.30 वाजता शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. 5 डॉक्टरांची टीम मिळून शवविच्छेदन करणार आहे. त्यानंतर अहवाल तयार करून हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत.

निर्भयाला उशिरा का होईना पण सुयोग्य न्याय मिळाल्या अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. तर अशा प्रकारच्या केस या फास्ट्रॅक कोर्टमध्ये तातडीनं चालवण्यात याव्यात त्यासाठी एवढा विलंब होऊ नये अशी मागणी विविध स्तरातून जोर धरू लागली आहे. निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी मुकेश, अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पनवन गुप्ता अशा चारही जणांना फाशी देण्यात आली. त्यानंतर देशभरातून निर्भायाला न्याय मिळाल्याचं समाधान व्यक्त केलं जात आहे.

हे वाचा-Nirbhaya Justice LIVE : नराधमांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी दीनदयाल रुग्णालयात

First published: March 20, 2020, 9:07 AM IST

ताज्या बातम्या