नवी दिल्ली 18 सप्टेंबर: राष्ट्रीय तपास एजन्सी म्हणजेच NIAने पश्चिम बंगालमधल्या मुर्शिबाद येथे छापे टाकून अलकायदा (Al-Qaeda) समर्थक दहशतवाद्यांना अटक केली होती. तसेच केरळमधल्या एर्नाकुलममध्येही छापे घालण्यात आले होते. या छाप्यांमध्ये 9 जणांना अटक करण्यात आली होती. त्या सगळ्यांकडून धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. महत्त्वाच्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची या दहशतवाद्यांची योजना होती अशी खळबळजनक माहिती NIAच्या तपासातून पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे दहशतवादी काश्मीरमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये होते. पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या म्होरक्यांनी त्यांना शस्त्रास्त्रे पुरविण्याचे आश्वासन दिले होते अशी माहितीही पुढे आली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व जण हे अल कायदाच्या हँडलरच्या संपर्कात होते. त्यांना पाकिस्तानातूनही मदत केली जात होती. या 9 जणांनी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये आपलं नेटवर्क उभारलं होतं आणि बॉम्ब स्फोटासाठी सामानाची जुळवाजुळवही केली होती असंही उघड झालं आहे.
अलकायदाचा स्लीपर सेल म्हणून हे लोक काम करत होते. त्यांनी आपलं नेटवर्क तयार केलं होतं. येणाऱ्या काळात त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारी आणखी अटक होऊ शकते असंही NIAच्या सूत्रांनी सांगितलं.