दिल्ली, 19 फेब्रुवारी : 'एनआयए' अर्थात 'राष्ट्रीय तपास यंत्रणा' आता पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्याचा तपास करणार आहे. 14 फेब्रुवारी पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. हल्ल्यानंतर 'एनआयए'नं देखील घटनास्थळी दाखल झाली होती. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी 'जैश - ए - मोहम्मद' या दहशतवादी संघटनेनं घेतली आहे.
पुलवामातील 21 वर्षाच्या आदिल दार या दहशतवाद्यानं स्फोटकांनी भरलेली कार जवानांच्या ताफ्यावर आदळून झालेल्या स्फोटात 40 जवान शहीद झाले होते. शिवाय, या हल्ल्याला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'चा देखील पाठिंबा होता. दरम्यान, पाकिस्ताननं आता भारतानं हल्ला केल्यास 'जशास तसे उत्तर' दिले जाईल अशी दर्पोक्ती केली आहे. या साऱ्या प्रकरणामध्ये भारतानं पुरावे दिल्यास कारवाई करू असं देखील पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे. पण, मुंबई हल्ल्याचे पुरावे दिल्यानंतर देखील पाकिस्ताननं कोणतीही कारवाई केलेली नाही.
मसूद अहमद पाकिस्तानमध्ये
पुलावामा हल्ल्याचे आदेश 'जैश - ए - मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसुद अहमदनं पाकिस्तानातील रूग्णालयातून दिले होते. मसूद सध्या पाकिस्तानमध्ये वास्तव्याला आहे. या साऱ्या गोष्टी स्पष्ट असताना देखील पाकिस्तान पुरावे मागत आहे.
यापूर्वी झालेल्या मुंबई हल्ल्यामध्ये देखील मसूदचा सहभाग स्पष्ट झाला होता.