मथुरा, 8 ऑगस्ट : केरल स्थित कोझिकोड (Kozhikode, Kerala) येथील विमान अपघातात एअर इंडियाच्या विमानाचे (Air India) पायलट मथुरा (Mathura) निवासी अखिलेश शर्मा यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अखिलेश यांची पत्नी मेघा गर्भवती आहे. 10 दिवसांनंतर त्यांची डिलिव्हरी होणार आहे. कालपर्यंत कुटुंबातील सर्वजण घरात नवा पाहुणा येणार असल्याने आनंदात होते.
लवकरच घरात पाळणा हलणार असल्याने कुटुंबीयातील सर्व सदस्य त्याचीच तयारी करीत होते. मात्र त्यापूर्वीच अखिलेश यांच्या मृत्यूचे वृत्त समोर आले. यामुळे कुटुंबात शांतता पसरली आहे. अखिलेश या जगात नाही यावर अद्यापही त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास बसत नाहीये. अखिलेश यांच्या मृत्यूबाबत कळताच मथुरामध्ये गोविंद नगर परिसरात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबात एक बोचरी शांतता पसरली आहे. 32 वर्षीय अखिलेश शर्मा एयर इंडियामध्ये पायलट होते. शुक्रवारी केरलमधील कोझिकोड स्थित करीपुर एयरपोर्टवर झालेल्या एयर इंडिया विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अखिलेश शर्मा यांच्या लग्नाला 10 डिसेंबरला दोन वर्ष पूर्ण झाली होती. त्यांची पत्नी गर्भवती आहे. कुटुंबीयांनी सांगितलं की अखिलेश लॉकडाऊनपूर्वी घरी आले होते. त्यांच्या कुटुंबात 2 भाऊ आणि 1 बहीण आहे. याशिवाय पत्नी मेघासह आई-वडिलही आहे.
हे वाचा-दीपक साठेंनी जीवाची बाजी लावून वाचवले प्रवाशांचे प्राण, वाचा भावाची FB पोस्ट
आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू
आयएक्स 1344 विमान कोझिकोडमध्ये शुक्रवारी सायंकाळी 7.41 मिनिटांनी हवाईपट्टीवरुन घसरलं. विमानात 10 लहान मुलं, 148 प्रवासी, दोन पायलट आणि चालक दलाचे चार सदस्य होते. या अपघातात कमीतकमी 19 जणांचा मृत्यू झाला आहे. कोझिकोड एयरपोर्टवरील एक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार येथे अनेक तासांपासून जोरदार पाऊस सुरू होता. अशात विमान पायलट कॅप्टन वसंत साठे यांनी एअरपोर्टच्या 2 फेऱ्या मारल्यानंतर रनवेवर उतरण्याचा प्रयत्न केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.