Home /News /national /

नवं संसद भवन आत्मनिर्भर भारताच्या आकांक्षेचं प्रतीक – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवं संसद भवन आत्मनिर्भर भारताच्या आकांक्षेचं प्रतीक – पंतप्रधान नरेंद्र मोदी

'भारतात लोकशाही ही फक्त व्यवस्था नाही तर ती जीवन पद्धती आहे. लोकशाही हा या देशाचा आत्मा आहे. हजारो वर्षांच्या परंपरेचं ते प्रतिक आहे.'

    नवी दिल्ली 10 डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरूवारी (10 डिसेंबर) देशाच्या नव्या संसद भवनाचं भूमिपूजन (New Parliament Building) केलं. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असतानाच या संसद भवनाचं काम पूर्ण करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे. चार मजल्यांचं हे संसद भवन हे आत्मनिर्भर भारताच्या आकांक्षेचं प्रतीक होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली. वैदिक मंत्रोच्चार आणि सर्वधर्म प्रार्थनेनंतर पंतप्रधानांनी नव्य संसद भवनाच्या कोनशिलेचंही अनावरण केलं. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला,  विविध राजकीय पक्षांचे नेते,  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह खासदार आणि अनेक देशांचे राजदूत उपस्थित होते. पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले, आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. भारताच्या संसदीय लोकशाहीत आजचा दिवस हा मैलाचा दगड ठरणार आहे. लोकशाहीचं हे मंदिर सर्व जगाला प्रेरणादायी ठरेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. सध्याच्या संसद भवनाने देशाची उभारणी होताना पाहिली आहे. हे नवं भवन इतिहासाचं साक्षिदार आहे. नवं संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल. नव्या भारताच्या उभारणीचं ते साक्षिदार ठरणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक शंका घेतल्या जात होत्या, प्रश्न विचारले जात होते. भारत गरिबी, दारिद्र्य, विषमता अशा सगळ्या प्रश्नांनी घेरलेला असतानाही भारताना सर्व शंकांवर मात करत देशाची उभारणी केली आणि आज भारत हा एकविसाव्या शतकात प्रवेश करण्यासाठी सशक्तपणे उभा आहे. भारतात लोकशाही ही फक्त व्यवस्था नाही तर ती जीवन पद्धती आहे. लोकशाही हा या देशाचा आत्मा आहे. हजारो वर्षांच्या परंपरेचं ते प्रतिक आहे. अनेक वर्षांपासून नव्या संसद भवनाची गरज बोलून दाखवली जात होती. ती गरज आता पूर्ण होत असून सर्व अत्याधुनिक गरजांनी पूर्ण असं हे संसद भवन आधुनिक भारताचं प्रतिक होईल असंही ते म्हणाले.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Narendra modi

    पुढील बातम्या