महाविकास आघाडीचं ठरलं, असा आहे सत्तेचा नवा फॉर्म्युला!

महाविकास आघाडीचं ठरलं, असा आहे सत्तेचा नवा फॉर्म्युला!

गेली अनेक दिवस चर्चा सुरू असल्याने नव नवे समिकरणं तयार होत असून उद्या काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची संयुक्त बैठक होणार आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 21 नोव्हेंबर : सत्तेचा पेच सोडविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आणि निर्णायक टप्प्यावर आलीय. सरकार स्थापनेच्या फॉर्म्युल्यावर काँग्रेस कार्यकारिणीत शिक्कामोर्तब झालंय. महाविकासआघाडी असं नव्या आघाडीचं नाव असणार आहे. महाशिवआघाडी हे नाव सेनेनं सुचवलेलं होतं पण काँग्रसने सेनेचा हा प्रस्ताव मान्य केला नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. किमान समान कार्यक्रमावरही तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तर समन्वयासाठी समन्वय समितीची स्थापना केली जाणार असल्याचीही माहिती पुढे आलीय.

काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. काँग्रेस थेट शिवसेनाला पाठिंबा देणार नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंब्याचे पत्र देणार आहे. सत्तेचा नवा फॉर्म्युला आता तयार झाला असून 11-11-11 या सूत्रानुसार सत्तेचं वाटप होणार आहे.

उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' 3 नेत्यांची नावं आघाडीवर

मुख्यमंत्रिपदाची विभागणी होणार?

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. सत्तास्थापनेच्या 50-50 फॉर्म्युल्याबद्दल बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रिपदाची पहिली टर्म शिवसेनेला मिळेल, अशी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे साहजिकच दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही वरिष्ठ नेत्यांकडून 'न्यूज18 लोकमत'ला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाबाबत माहिती मिळाली आहे. आगामी मंत्रिमंडळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अनुभवी नेत्यांच्या खांद्यावर धुरा देण्याचं ठरवलेलं दिसत आहे. आघाडी सरकारमध्ये सामील असलेले अनेक नेते पुन्हा नव्या मंत्रिमंडळातही दिसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे 10 तर काँग्रेसचे 9 मंत्री ठरले! संभाव्य मंत्र्यांची यादी समोर

शिवसेनेच्या मागणीमुळे वाद

एकीकडे शिवसेनेबरोबर युती करण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे आणि तेही शिवसेनेनं उचलून धरल्यामुळे! शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभेत वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावं अशी मागणी केली आणि महाराष्ट्राच अनेकांच्या भुवया उंचावल्या. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना यांच्या पर्यायी सरकारचा विचार होताना शिवसेनेनं हिंदुत्वाला आणि वीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीला बाजूला ठेवावं अशी काँग्रेसची अट असल्याची सूत्रांची माहिती होती. आता शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच सावरकरांच्या मुद्द्यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2019 03:28 PM IST

ताज्या बातम्या