नवी दिल्ली, 13 जून: सत्ताधारी भाजपमध्ये एक व्यक्ती, एक पद हे धोरण असले तरी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका या अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह हरियाणा आणि झारखंडमधील विधानसभा निवडणूका अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे नक्की झाले आहे. या निर्णयामुळे पक्षाचे नेतृत्व कोण करणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आता नवा राष्ट्रीय अध्यक्ष नेमण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरू झाल्या होत्या. अध्यक्षपद कोणाकडे द्यायचे यासाठी आज नवी दिल्ली भाजपची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व राज्याचे प्रमुख देखील उपस्थित होते.
अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पक्ष संघटना, निवडणूक अभियान आदी गोष्टींवर चर्चा झाली. बैठकीसाठी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, रामन सिंह आणि वसुंधरा राजे, कैलाश विजयवर्गीय, भूपेन्द्र यादव आणि जे.पी.नड्ड यादी नेते देखील उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षात सप्टेंबरपर्यंत पक्षातील अन्य पदांच्या निवडणूका होतील. तोपर्यंत शहा यांच्याकडेच अध्यक्षपद असेल आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील.
गुरुवारी झालेल्या बैठकीत पुढील सहा महिन्यात भाजपच्या पक्षाअंतर्गत निवडणुका घेतल्या जातील आणि त्यानंतर भाजपचा नवा अध्यक्ष निवडला जाईल, असे भूपेंद्र यादव यांनी सांगितले. अमित शहा यांच्याकडे 2014मध्ये पक्षाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पक्षाला जवळ जवळ सर्वच विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून दिला. शहा यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ या वर्षाच्या सुरुवातीलाच संपला होता. पण पक्षाने लोकसभा निवडणूक होईपर्यंत अध्यक्षपदावर कायम राहण्यास सांगितले होते. भाजप पक्ष घटनेनुसार एखादी व्यक्ती अध्यक्षपदावर 3 वर्षच राहू शकते.
अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने यंदा 303 जागांवर विजय मिळवला आहे. आता मोदी 2.0 सरकारमध्ये शहा यांना गृहमंत्रीपद मिळाल्यामुळे दोन्ही जबाबदारी पार पाडणे शक्य होणार नाही. त्यामुळेच नव्या अध्यक्षाचा शोध सुरु आहे.
VIDEO : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून तुमचं नाव पुढे? उदयनराजेंची तुफान फटकेबाजी