नवी दिल्ली, 27 मे: लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा शपथवधी आणि मंत्रिमंडळाच्या स्थापनेला वेग आला आहे. 2014मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)चा भाग नसलेले जेडीयू आणि अण्णाद्रमुक हे दोन नवे पक्ष यावेळी मोदी सरकारमध्ये असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय मोदींच्या मंत्रिमंडळात पश्चिम बंगाल आणि तेलंगणा या राज्यातून नवे चेहेरे दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जेडीयूमधील एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार यावेळी बिहारमधून पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. येत्या 30 तारखेला म्हणजे गुरुवारी मोदी पंतप्रधान म्हणून त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात करतील. अर्थात शपथविधी सोहळ्याची अधिकृत तारिख आणि वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच नव्या मंत्रिमंडळात कोणते नवे चेहेरे असतील हे देखील सांगण्यात आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींच्या पहिल्या कार्यकाळातील जवळ जवळ सर्व मंत्र्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या मंत्रिमंडळात अर्थ खाते सांभाळणारे अरुण जेटली यांची प्रकृती बिघडल्याने ते यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात असतील की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. जेटलींच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. जेटली यांच्या प्रकृती संदर्भात अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पक्षाने देखील केले आहे.
मंत्रिमंडळात राजनाथ सिंह, नितिन गडकरी, निर्मला सीतारमण, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल, नरेंद्र सिंह तोमर आणि प्रकाश जावडेकर या नेत्यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. याशिवाय आणखी एका मोठ्या नावाची चर्चा आहे. पक्षाला सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत यश मिळवून देणारे अध्यक्ष अमित शहा यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. यासंदर्भात शहा यांनी आतापर्यंत कोणतेही वक्तव्य केले नाही. पण त्यांच्या समावेशाची जोरदार चर्चा आहे.
रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाकडून चिराग पासवान यांचे नाव पुढे करण्यात येऊ शकते. गेल्या मंत्रिमंडळात राम विलास पासवान कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्या पक्षाने यावेळी 6 जागांवर विजय मिळवला असून त्यात चिरागचा देखील समावेश आहे. अण्णा द्रमुकला यावेळी एकच जागा मिळाली असली तरी नव्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद मिळू शकते. तामिळनाडूत अण्णा द्रमुकची सत्ता आहे आणि दक्षिण भारतातील भाजपचा एक महत्त्वाचा मित्र पक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
VIDEO: 'रामराजे हे बिनलग्नाची औलाद', भाजपच्या नवनिर्वाचित खासदाराची खालच्या पातळीवर टीका