Education policy 2020: दाक्षिणात्य राज्याचा मोदींविरोधात एल्गार; 'त्रिभाषा सूत्री आम्हाला अमान्य'

Education policy 2020: दाक्षिणात्य राज्याचा मोदींविरोधात एल्गार; 'त्रिभाषा सूत्री आम्हाला अमान्य'

NEP मधून मातृभाषेबरोबर हिंदी आणि संस्कृतच्या मोदी सरकारच्या आग्रहाला तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी (Edappadi K Palaniswami ) कडाडून विरोध केला आहे.

  • Share this:

चेन्नई, 3 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने सुरू होणाऱ्या नव्या शिक्षण धोरणात (New Education Policy 2020) पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण द्यावं, अशी शिफारस आहे. त्याबरोबरच हिंदी भाषाही देशभरात सर्वत्र बंधनकारक असेल, अशी त्रिभाषा सूत्री NEP मध्ये देण्यात आली आहे. पण याला तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी (Edappadi K Palaniswami ) कडाडून विरोध केला आहे. आमच्या राज्यात भाषा हा संवेदनशील विषय आहे आणि त्रिभाषा सूत्री लागू करणार नाही, असा स्पष्ट पवित्रा या राज्याने घेतला आहे.

तामिळनाडूप्रमाणेच अन्य दाक्षिणात्य राज्यांचाही त्रिभाषा सूत्रीला विरोध आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री इडाप्पाडी पलानीस्वामी यांनी निवेदन जाहीर केलं आहे. त्यात त्रिभाषा सूत्रीला थेट विरोध केला आहे आणि पंतप्रधान मोदींनी राज्यांना शिक्षण धोरणात बदल करण्याचं स्वातंत्र्य द्यावं अशी मागणीही केली आहे.

NEP ला यापूर्वीच तामिळनाडूच्या विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला होता. द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन म्हणाले की, समविचारी पक्षांच्या आग्रहाने देशभरात हिंदी आणि संस्कृत भाषेचा प्रचार करण्यासाठी त्रिभाषा सूत्री आणली आहे आणचा त्याला विरोध आहे. भारताच्या राज्यघटनेतल्या राज्यांच्या सार्वभौमत्वावरच हा घाला आहे, अशा शब्दांत स्टॅलिन यांनी विरोध दर्शवला होता. आता अण्णा द्रमुक सरकारनेही त्यांचीच री ओढत त्रिभाषा सूत्रीला विरोध केला आहे. तमिळ अस्मितेचा प्रश्न करत संस्कृत आणि हिंदीला विरोध म्हणून या दाक्षिणात्य राज्यांनी त्रिभाषा सूत्रीला विरोध आहे.

नवीन शिक्षण धोरणातल्या या भाषेच्या आग्रहामुळे दक्षिणेकडे रान पेटणार हे यामुळे निश्चित झालं आहे.

संबंधित - मोदी सरकारचा शिक्षण पद्धतीत मोठा बदल; यापुढे नसेल 10वी 12 वी बोर्डाची परीक्षा

नव्या शिक्षण धोरणात (NEP) मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व दिलं आहे. पण देशभरात वाढलेल्या स्थलांतराचं प्रमाण पाहता मातृभाषेबरोबर इंग्रजी आणि हिंदीचं शिक्षणही विद्यार्थ्यांना देण्याबद्दल या धोरणात तरतूद आहे.

हे वाचा - शिक्षण पद्धतीमधील बदलानं अभ्यासापासून ते निकालापर्यंत काय होणार मोठे बदल

संस्कृतसारख्या इतर काही भाषा विद्यार्थ्यांना शिकायला प्रोत्साहन देणारं हे धोरण आहे. लहान वयातच मुलांनी अधिकाधिक भाषा शिकून घ्याव्यात, असं यात म्हटलं आहे. म्हणून त्रिभाषा सूत्री यात नमूद केली आहे. पण संस्कृतोद्भव भाषांना तामिळनाडूतून विरोध होत आहे. तामिळनाडूमध्ये काही वर्षांपूर्वी भाषाशुद्धीची चळवळ गाजली होती. तामीळ भाषेतले संस्कृतमधून आलेले शब्द हद्दपार करण्याची ही चळवळ होती.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 3, 2020, 2:50 PM IST

ताज्या बातम्या