लंडन, 12 जून : पंजाब नॅशनल बँकेसह भारतातल्या सरकारी बँकांची करोडो रुपयांची फसवणूक करून लंडनला पळून गेलेल्या नीरव मोदीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. हिरे व्यापारी असलेल्या नीरव मोदीचा जामीन अर्ज चौथ्यांदा फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे तो आता लंडनच्या तुरुंगातच राहणार आहे.नीरव मोदीला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमध्ये १९ मार्च ला अटक केली होती. त्यानंतर भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकताच युकेच्या वेस्टमिनस्टर कोर्टाने गेल्या महिन्यात त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
15 महिन्यांपासून बेपत्ता
नीरव मोदीने बँकांची 13 हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तो 15 महिन्यांपासून बेपत्ता आहे. नीरव मोदीच्या या कटामुळे पीएनबी बँकेची आर्थिक प्रगती रोखली गेली होती. या बँकेचा शेअर चांगलाच गडगडला. हे सगळं समोर आल्यावर एकच खळबळ माजली. याच दिवसांत नीरव मोदी देश सोडून फरार झाला. तेव्हापासून भारत सरकार नीरव मोदीला भारतात आणण्याचे प्रयत्न करत होतं. त्यानंतर नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली.
3 वेळा फेटाळली होती याचिका
वेस्ट मिनिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने नीरव मोदीची जामीन याचिका याआधी 3 वेळा फेटाळली होती. नीरव मोदी लंडनमधून पळून जाऊ नये म्हणून कोर्ट त्याला जामीन मंजूर करत नाही, असं सांगितलं जातं. पीएनबी बँक घोटाळ्यामध्ये या बँकेच्या अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप नीरव मोदीवर आहे.
दरम्यान, नीरव मोदीसाठी मुंबईमधल्या आर्थर रोड तुरुंगात १२ नंबरची बराक तयार ठेवण्यात आली आहे. युकेमधून नीरव मोदीचं प्रत्यार्पण झालं तर रवानगी या तुरुंगात केली जाणार असल्याची माहिती आहे.
=================================================================================================
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे उद्या 2 तास बंद राहणार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या