नवी दिल्ली, 16 मार्च : मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze Arrest) यांना एका गंभीर प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर राज्य सरकारवर टीकेझी झोड उठवण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्याचा जर एखाद्याच्या मृत्यू प्रकरणात हात असेल तर राज्याच्या कायदा-सुव्यस्थेचं काय, असा प्रश्न विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून (BJP) उपस्थित केला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे किंगमेकर अशी ओळख असणारे शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी नवी दिल्ली इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
'एखाद्या पोलीस उपनिरीक्षकाचा राज्यावर परिणाम होत नाही. राज्याचा पोलीस विभाग चांगलं काम करत आहे,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच मुंबई पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याच्या चर्चेवरही पवार यांनी भाष्य केलं आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, 'पोलीस आयुक्तांचा राजीनामा घेणारा मी कोण आहे? याबाबत सरकार निर्णय घेईल.'
सचिन वाझे प्रकरणावरून महाविकास आघाडीत संघर्ष निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'महाराष्ट्र सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत कुठलाही वाद नाही,' असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते पी सी चाको यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. 'भाजप विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. पवार हे करू शकतात,' असा विश्वास राष्ट्रवादी प्रवेशावेळी पी सी चाको यांनी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sachin vaze, Sharad pawar