Home /News /national /

शरद पवारांचं एक वक्तव्य आणि विधानसभा अध्यक्षपदाबाबत सुरू झाली उलटसुलट चर्चा

शरद पवारांचं एक वक्तव्य आणि विधानसभा अध्यक्षपदाबाबत सुरू झाली उलटसुलट चर्चा

शरद पवार यांनी नवी दिल्ली इथं बोलताना राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी ते देशभरात उभं राहिलेलं शेतकरी आंदोलन अशा अनेक मुद्द्यांवर चौफेर भाष्य केलं आहे.

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्ली इथं बोलताना राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी ते देशभरात उभं राहिलेलं शेतकरी आंदोलन अशा अनेक मुद्द्यांवर चौफेर भाष्य केलं आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाला संधी द्यायची, याबाबत महाविकास आघाडीत पुन्हा चर्चा होणार आहे. काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष बदलताना आमच्याशी चर्चा केली. काँग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्यानं अध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्षपद तिन्ही पक्षाचं होतं, ते आता खुलं झालं आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पदावर होणाऱ्या आगामी नियुक्तीबाबत नवा सस्पेन्स तयार केला आहे. 'ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हाही असे कधी दिसले नाही...' शेतकरी आंदोलनाबाबत सरकार संवेदनशील नाही. शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसक मार्ग निवडला तर देशासमोर गंभीर संकट येईल आणि याची जबाबदारी सत्ताधारी भाजपवर असेल, असा गंभीर इशारा शरद पवार यांनी दिला आहे. सरकारच्या निष्क्रियतेमुळे आंदोलन आंतरराष्ट्रीय प्रश्न बनल्याचंही पवार यांनी यांनी म्हटलं आहे. हेही वाचा - पॉप स्टार रिहाना मुस्लीम आहे का? Google वर भारतीयांनी केला या प्रश्नाचा सर्वाधिक सर्च यावेळी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर टीका केली. 'सरकारने यावर तोडगा काढण्याची गरज होती. परंतु, दिल्लीत बसून सत्ता चालविणाऱ्या पंतप्रधानांना दिल्लीपासून काही किलोमीटरवर बसलेल्या शेतकऱ्यांशी बोलण्याची इच्छा नाही. कितीही दिवस आंदोलनाची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्नदात्याशी बोलण्याची, समस्या सोडविण्याची सरकारची तयारी नाही. शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शांततेऐवजी दुसरा मार्ग पत्करला तर देशासमोर भयंकर संकट येईल. याची जबाबदारी सत्ताधारी भाजपवर असेल. ज्यांच्या हाती सत्ता आहे, ते संवेदनशील नाहीत. अशा प्रकारे असंवेदनशील राहणाऱ्यांची सत्ता आज ना उद्या संपुष्टात येते. तशीच परिस्थिती देशात निर्माण होऊ लागली आहे एवढेच सांगू इच्छितो,' अशा दावा शरद पवार यांनी केला आहे. 'संसदेचे सदस्य शेतकऱ्यांची विचारपूस करायला गेले होते. त्यांना माघारी यावे लागले. ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हाही असे कधी दिसले नाही. शेतकऱ्यांना जी वागणूक दिली जात आहे, यापुढेही तशीच वागणूक राहिली तर देशापुढे, समाजापुढे आणि सरकारपुढे भयंकर संकट निर्माण होईल. पेट्रोल, डिझेलची दरवाढ 2-4 रुपयांची असून यामुळे फक्त श्रीमंतांना त्रास होईल, असे लोकांना वाटत असेल तर तो भ्रम आहे. या दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना, सर्वासामान्य ग्राहकांना, कारखान्यातील कामगारांना, मजुरांना, कुटीर उद्योगांना बसतो. अंतिमतः याची किंमत जनतेला चुकवावी लागते. या परिस्थितीमुळे देशभरात नाराजी असून विरोधकांनी यावर एकत्रित विचार करावा आणि पुढील दिशा ठरवावी,' असं आवाहनही पवार यांनी केले.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Farmer, Farmer protest, Sharad Pawar (Politician)

पुढील बातम्या