नवी दिल्ली 18 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी (18 नोव्हेंबर) सोनिया गांधी यांची पुन्हा एकदा भेट घेतली. पवार सोनियांच्या निवासस्थानी गेल आणि त्यांनी तब्बल पाऊन तास चर्चा केली. शरद पवार हे याआधीही सोनियांना भेटले आहेत. मात्र त्यातून फार काहीच निघालेलं नाही. सोनियांना भेटण्याआधी पवारांच्या वक्तव्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याविषयी तुम्ही भाजप आणि शिवसेनेलाच विचारा कारण त्यांनी एकत्र येवून निवडणूक लढवली होती असं पवार म्हणाल्याने शिवसेनेची चिंता वाढली होती. बैठकीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विट करत या बैठकीत काहीही ठरलं नसल्याची माहिती दिली. पवारांनी सोनिया गांधी महाराष्ट्रातल्या स्थितीची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी दिल्लीत भेटणार असल्याचं ते म्हणाले.
Sh. Sharad Pawar met the Congress President today and briefed her on the situation in Maharashtra. It was decided that in a day or two, representatives from NCP & Congress will meet in Delhi to discuss the way forward
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत भाषण केलं. राज्यसभेच्या बैठकीचं हे 250वं सत्र असल्यानं पंतप्रधानांनी भाषणात संसदेचं वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या योगदानाची चर्चा केली. पंतप्रधान म्हणाले, लोकांच्या भाव-भावनांचं हे सभागृह प्रतिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेच्या माध्यमातूनच देशासाठी मोठं योगदान दिलं. त्यामुळे राज्यसभेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र हे करताना राज्यसभेनेनं अडवणुकीचं कारण न बनता प्रवाही राहावं असं मतही त्यांनी व्यक्त केलं आणि हे करताना त्यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेचं कौतुक केलं. पंतप्रधान म्हणाले, आंदोलनं आणि इतर कारणांमुळे संसदेचा वेळ वाया जातो. राज्यसभेत विविध मुद्यांवर अधिक गंभीरपणे आणि विस्तृत चर्चा होणं अपेक्षीत आहे.
मात्र गोंधळ आणि गदारोळात आजकाल सगळा वेळ वाया जातो. त्यातून काहीही निघत नाही. याचा सर्वच राजकीय पक्षांनी विचार केला पाहिजे. राजकीय पक्षांनीही विरोध करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे. हे सांगताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेचं कौतुक केलं.
पंतप्रधान पुढे म्हणाले, राष्ट्रवादीने अशी भूमिका घेतली होती की विरोध करत असताना कधीही सभागृहाच्या 'वेल'मध्ये उतरणार नाही. अशीच भूमिका भाजपनेही घेतली होती आणि मला सांगताना आनंद वाटतो की राष्ट्रवादीने अनेक कठीण प्रसंगातही या भूमिकेचं पालन केलं. भाजपनेही हा नियम पाळला आणि हे करत असताना त्याचा कुठलाही राजकीय तोटा राष्ट्रवादी आणि भाजपलाही झाला नाही. महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचं कौतुक करण्याला वेगळं महत्त्व असून भाजपचं हे नवं महाराष्ट्र कनेक्शन आहे का याची चर्चा सुरू झालीय.