नवी दिल्ली 23 जानेवारी : भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांच्या धाडसाच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. आपत्तीच्या काळात नेमकं काय केलं पाहिजे, सेफ लँडिंग कसं करावं असं खास प्रशिक्षण या वैमानिकांना दिलं जातं. त्या प्रशिक्षणाचा उपयोग करत एअर फोर्सच्या वैमानिकांनी आज धाडसी लँडिंग केलं आणि मोठा अपघात टळला. सोशल मीडियावरही या धाडसी आणि भन्नाट लँडिंगचे व्हिडीओ येत आहेत. हे विमान चक्क एक्सप्रेस हायवेवरच उतरल्याने नेमकं झालं काय हे पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
गाझियाबादच्या ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वेवर हे विमान अचानक उतरविण्यात आलं होतं. छोटेखानी असलेल्या या विमानात NCC कॅडेट्सला प्रशिक्षण देण्यात येत होतं. विमानाचा सराव सुरु असतानाच विमानात काही तांत्रिक दोष निर्माण झाला. अचानक झालेल्या या बिघाडामुळे वैमानिकाने हे विमान एक्सप्रेसवेवरच उतरविण्याचा निर्णय घेतला.
विमानाचा वेग कमी करत त्यांनी सुरक्षित पणे विमान हायवेवर उतरवलं. त्यामुळं सगळी वाहतूकही थांबली होती. पोलिसांना माहिती कळाल्यानंतर त्यांनी तातडीने बॅरेकेट्स लावून विमानाला घेराव घातला. सुदैवाने विमानातले सर्वजण सुखरून उतरले. विमानात दोन जवान होते.
या विमानाने बरेलीमधल्या हवाईदलाच्या तळावरून उड्डाण केलं होतं. तिथून ते गाझियाबादमधल्या तळावर येत होतं. पण मध्येच बिघाड झाल्याने त्यांना इमर्जर्न्सी लँडिंगचा निर्णय घ्यावा लागला. घटनेची माहिती मिळताच हवाईदलाच्या दोन हेलिकॉप्टरनी हे विमान सरळ केलं आणि ते उचलून हवाई दलाच्या तळावर नेलं.
Published by:Ajay Kautikwar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.