मराठी बातम्या /बातम्या /देश /

Girl Child Schemes : मुलगी शिकली, प्रगती झाली! मुलींसाठीच्या 'या' सरकारी योजना माहिती आहेत का?

Girl Child Schemes : मुलगी शिकली, प्रगती झाली! मुलींसाठीच्या 'या' सरकारी योजना माहिती आहेत का?

मुलींसाठी योजना

मुलींसाठी योजना

मुलींच्या शिक्षणासाठी किंवा एकंदरच त्यांच्या विकासासाठी सरकारतर्फेही अनेक योजना राबवल्या जातात. देशभरात खास मुलींसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 सप्टेंबर:  नवरात्र ही स्त्री-शक्तीचा उत्सव असतो. त्या निमित्ताने, समाजात काही विशेष कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव केला जातो; मात्र प्रत्येक स्त्रीच कर्तृत्ववान असते. कारण ती कुटुंबव्यवस्थेला आकार देते, पुढच्या पिढीला केवळ जन्म देत नाही, तर त्या पिढीला घडवतेही. म्हणूनच 'मुलगी शिकली, प्रगती झाली' हे घोषवाक्य प्रसिद्ध आहे. हे सगळं लक्षात घेऊन मुली-महिलांना केवळ नवरात्रापुरतंच महत्त्व देणं पुरेसं नाही. त्यांचा कायमच सन्मान केला पाहिजे. पूर्वीपासून मुलगा-मुलगी असा भेद केला जात असल्याने दर हजार पुरुषांच्या मागे स्त्रियांचं प्रमाण कमी आहे; मात्र गेल्या काही वर्षांत जनजागृती वाढल्याने मुलींचंही आनंदाने संगोपन करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. मुलींच्या शिक्षणासाठी किंवा एकंदरच त्यांच्या विकासासाठी सरकारतर्फेही अनेक योजना राबवल्या जातात. त्या योजना लाभदायक ठरतात. त्या योजनांची माहिती घेऊ या.

सुकन्या समृद्धी योजना : आई-वडिलांना आपल्या मुलींच्या नावे बचत आणि गुंतवणूक करता यावी, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. कमी कालावधीतच या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेत आतापर्यंत सुमारे 1.26 कोटी खाती उघडली गेली असून, त्या अंतर्गत सुमारे 20 हजार कोटी रुपयांची ठेव ठेवण्यात आली आहे. नवजात मुलीपासून 10 वर्षांपर्यंतच्या दोन मुलींच्या नावे या योजनेअंतर्गत खातं उघडता येतं. हे खातं कोणतीही बँक किंवा पोस्टात उघडता येतं. यातले पैसे मुदतपूर्तीआधी काढता येत नसल्याने मुलीचं शिक्षण किंवा लग्नासाठी ते वापरता येतात. व्याजदरही अन्य योजनांच्या तुलनेत चांगला असतो.

माझी कन्या भाग्यश्री (महाराष्ट्र) : एका मुलीच्या जन्मानंतर किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर आई-वडिलांनी नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतली, तर मुलींच्या नावे 50 हजार रुपयांची ठेव महाराष्ट्र सरकारतर्फे ठेवली जाते. एका मुलीनंतर शस्त्रक्रिया केली असेल, तर 50 हजार रुपये आणि दोन मुलींनंतर शस्त्रक्रिया केली असेल तर प्रत्येक मुलीच्या नावे 25 हजार रुपये ठेवले जातात. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतरच ही रक्कम काढता येते. मुलगी 6 वर्षांची आणि 12 वर्षांची असताना त्यावरचं व्याज काढता येतं. दारिद्र्यरेषेखालच्या, तसंच वार्षिक उत्पन्न साडेसात लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो.

हेही वाचा - Navratri Colours 2022 : तुम्हाला माहिती आहेत का नवरात्रीच्या नऊ दिवसांचे रंग आणि त्यांचे अर्थ? जाणून घ्या

बेटी बचाओ, बेटी पढाओ : 2015 साली सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश मुलींच्या जन्माला, शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा आहे. त्या दृष्टीने या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. सुकन्या समृद्धी योजना ही या योजनेचाच एक भाग आहे. स्त्री-भ्रूण हत्या रोखणं, मुलगा-मुलगी भेद नाहीसा करणं, मुलींसाठी सुरक्षित वातावरण तयार करणं, त्यांना चांगलं शिक्षण आणि अन्य सोयी उपलब्ध करून देणं हे या योजनेचे उद्देश आहेत.

सीबीएसई उडान योजना : सीबीएसई आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ही योजना मुलींसाठी राबवली जाते. तंत्रशिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या वाढावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं, हा त्यामागचा उद्देश आहे. दहावीत सरासरी 70 टक्के आणि गणित व विज्ञानात 80 टक्के मार्क्स मिळवलेली कोणीही मुलगी या योजनेसाठी पात्र ठरू शकते. या योजनेसाठी निवड झालेल्या मुलींना 11वी, 12वीसाठी मोफत कोर्स मटेरियल आणि ऑनलाइन रिसोर्सेस उपलब्ध करून दिले जातात. त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवलं जातं. अभ्यासात साह्य केलं जातं. शंकानिरसनासाठी टोल फ्री नंबर उपलब्ध केला जातो. गुणवान मुलींना योग्य त्या करिअर संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

माध्यमिक शिक्षणासाठी इन्सेन्टिव्ह देणारी राष्ट्रीय योजना : ही योजनादेखील गरीब कुटुंबातल्या मुलींसाठी आहे. आठवी उत्तीर्ण होऊन नववीत गेलेल्या 16 वर्षांखालच्या अविवाहित मुलींसाठी ही योजना आहे. त्यानुसार पात्र मुलींच्या नावे 3000 रुपयांची मुदत ठेव ठेवली जाते. तिच्या वयाची 18 वर्षं पूर्ण झाल्यावर आणि 10वी पूर्ण झाल्यावर ती हे पैसे काढू शकते. केंद्र सरकारची ही योजना मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी आहे.

बालिका समृद्धी योजना : गरीब कुटुंबांतल्या मुलींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक साह्य या योजनेअंतर्गत दिलं जातं. दारिद्र्यरेषेखालच्या कुटुंबात 15 ऑगस्ट 1997 नंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो. पात्र मुलींच्या कुटुंबीयांना रोख रक्कम दिली जाते. तसंच, मुली शाळेत जायला लागल्यानंतर त्यांना 300 ते 1000 रुपयांची स्कॉलरशिपही दिली जाते.

हेही वाचा - गर्ल्स हॉस्टेलमधील व्हायरल MMS प्रकरणात धक्कादायक अपडेट; मास्टरमाईंड निघाला लष्करातला!

लाडली योजना, कन्या कोश योजना (हरियाणा) : 20 ऑगस्ट 2005 नंतर हरियाणा राज्यातल्या कोणालाही दुसरी मुलगी झाली असेल, तर अशा कुटुंबांना प्रति वर्षी 5 हजार रुपये पाच वर्षांसाठी दिले जातात. 2015 साली कन्या कोश योजना सुरू करण्यात आली. पहिली मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या नावे सरकारतर्फे 21 हजार रुपये ठेवले जातात. 18व्या वर्षी ती रक्कम एक लाख रुपये होते.

लाडली लक्ष्मी योजना (मध्य प्रदेश) : यामध्ये मध्य प्रदेशातल्या दारिद्र्यरेषेखालच्या कुटुंबीयांच्या मुलींना लाभ मिळतो. त्यांच्या नावे सहा हजार रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रं पाच वर्षं दिली जातात. दोन हजार रुपये सहावीत प्रवेश घेताना, चार हजार रुपये नववीत प्रवेश घेताना काढता येतात. सगळी रक्कम 21व्या वर्षी मुलीला काढते येते; मात्र त्यासाठी 18व्या वर्षापर्यंत मुलीचं लग्न होता कामा नये अशी अट आहे. तसंच, या कालावधीत तिच्या शिक्षणात अजिबात खंड पडता कामा नये, अशीही अट आहे.

मुख्यमंत्री बालिका संरक्षण योजना (तमिळनाडू) : 2011 नंतर तमिळनाडूत जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना आहे. कुटुंबात एकच मुलगी असल्यास तिच्या नावे 50 हजार आणि दोन मुली असल्यास प्रत्येकी 25 हजार रुपये ठेव सरकारतर्फे ठेवली जाते. ठेवीच्या सहाव्या वर्षापासून दर वर्षी 1800 रुपयांचा इन्सेन्टिव्ह मिळतो. 18 व्या वर्षी ठेवीचे पैसे व्याजासह मुलीला दिले जातात; मात्र त्यासाठी तिने दहावीची परीक्षा दिलेली असणं आवश्यक आहे.

भाग्यश्री योजना (कर्नाटक) : या योजनेनुसार कर्नाटक राज्य सरकार दारिद्र्यरेषेखालच्या कुटुंबांमध्ये जन्माला आलेल्या जास्तीत जास्त दोन मुलींना सरकार साह्य करतं. वार्षिक 25 हजार रुपयांचं हेल्थकेअर कव्हरेज आणि दहावीपर्यंत वार्षिक 300 ते एक हजार रुपये स्कॉलरशिप असं योजनेचं ढोबळ स्वरूप आहे.

First published:

Tags: Navratri