चंडीगड, 1 एप्रिल : माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू रोड रेज प्रकरणात एक वर्षाची शिक्षा भोगून बाहेर आले आहेत. शनिवारी पंजाबच्या पटियाला जेलमधून सिद्धू यांची सुटका झाली. जेलमधून बाहेर येताच सिद्धू यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा तानाशाही आली तेव्हा क्रांती घडली, क्रांतीचं नाव राहुल गांधी आहे, असं सिद्धू म्हणाले.
लोकशाही बेड्यांमध्ये आहे, पंजाब देशाची ढाल आहे, जिला तोडण्याचा प्रयत्न होत आहे. पहिले कायदा-सुव्यवस्थेची समस्या निर्माण केली जाते आणि मग आम्ही शांत केलं, असं सांगितलं जातं, असा आरोप सिद्धू यांनी केला आहे.
पंजाबला कमजोर केलं तर स्वत: कमजोर व्हाल. मी स्वत:च्या कुटुंबासाठी लढत नाहीये. राहुल गांधींच्या पुर्वजांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. राहुल गांधी लोकशाहीच्या बेड्या तोडत आहेत. वाघ डरकाळी फोडत आहे आणि त्याची डरकाळी अमेरिका, जर्मनीमध्येही ऐकू जात आहे, असं सिद्धू म्हणाले.
#WATCH | Congress leader Navjot Singh Sidhu released from Patiala jail, approximately 10 months after he was sentenced to one-year jail by Supreme Court in a three decades old road rage case pic.twitter.com/kzVB2vMnpk
— ANI (@ANI) April 1, 2023
जेलमधून बाहेर आल्यानंतर सिद्धू पहिले घरी जाऊन पत्नी आणि कुटुंबाची भेट घेणार आहेत, यानंतर ते धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील, असं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.
नवजोत सिंग सिद्धू यांचं स्वागत करण्यासाठी काँग्रेस नेते जेलच्या बाहेर जमा झाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सिद्धू बाहेर येताच नवजोत सिद्धू जिंदाबादचे नारे लावले, तसंच ढोलाच्या गजरात सिद्धू यांचं स्वागत करण्यात आलं.
सिद्धू यांच्या समर्थकांकडून पटियाला शहरात अनेक ठिकाणी पोस्टर आणि होर्डिंग लावण्यात आले होते. रोड रेज प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सिद्धू यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.