Home /News /national /

National Mathematics Day 2020: जाणून घ्या महान गणितज्ज्ञ रामानुजन यांच्याविषयी

National Mathematics Day 2020: जाणून घ्या महान गणितज्ज्ञ रामानुजन यांच्याविषयी

22 डिसेंबर 1887 हा श्रीनिवासन रामानुजन (Srinivasan Ramanujan) यांचा जन्मदिन. त्यांनी जागतिक स्तरावर गणित विषयात दिलेल्या योगदानामुळे 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिन (National Mathematics Day) म्हणून साजरा केला जातो.

मुंबई, 22 डिसेंबर : आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानातील शोध आणि प्रगतीबाबत नेहमीच आपण पश्चिमेकडच्या देशांची उदाहरणं देतो. युरोप, अमेरिकेतील शास्रज्ञांनी चिकाटीने प्रयोग करून अनेक शोध लावले, ज्यामुळे संपूर्ण मानवजातीचं आयुष्यचं बदललं. पण भारतातही अनेक महान शोध लागले भारतातही अनेक शास्रज्ञ होऊन गेले ज्यांच्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते. गणित हा तसा बहुतांश जणांना नावडणारा विषय. शाळा संपल्यावर आता गणित-भूमितीचा पिच्छा सुटणार असं आपल्यापैकी बरेचजण म्हणाले असतील. गणितातील सर्वांत महत्त्वाचा शून्यचा शोध भारतीय ऋषी आर्यभट्ट यांनी लावला. त्यामुळेच गमतीने लोक म्हणतात भारतानी जगाला शून्य दिलं. हे शून्यच नसेल तर नऊच्या पुढे अंकच मोजता येणार नाहीत. असेच एक महान गणितज्ज्ञ भारतात होऊन गेले, ते म्हणजे श्रीनिवासन रामानुजन (Srinivasan Ramanujan). 22 डिसेंबर 1887 हा श्रीनिवासन रामानुजन (Srinivasan Ramanujan) यांचा जन्मदिन. त्यांनी जागतिक स्तरावर गणित विषयात दिलेल्या योगदानामुळे 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिन (National Mathematics Day) म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांनी त्यांच्या जीवनात अनेक चढ-उतार पाहिले आणि त्यावर मात करत त्यांनी ही उंची गाठली. अवघ्या 32 वर्षांच्या आयुष्यात रामानुजन यांनी गणिताच्या क्षेत्रात खूप मोठं योगदान दिलं. आपल्याला परीक्षेत नेहमी सोपे प्रश्न आधी सोडवा असं सांगितलं जातं, पण रामानुजन फक्त अवघड प्रश्न सोडवायचे आणि बाकीचे सोपे प्रश्न होते म्हणून सोडून द्यायचे. जन्म आणि गाव तमिळनाडूतील इरोडे गावातल्या एका तमिळ अय्यंगार ब्राह्मण घरात 22 डिसेंबर 1887 या दिवशी रामानुजन यांचा जन्म झाला. त्यांची आई गृहिणी होती. रामानुजन यांच्यानंतर त्यांना तीन भावंडं झाली पण ती एका वर्षात दगावली. रामानुजन हे बालपणापासूनच खूप हुशार होते. शाळा आणि त्रिकोणमिती रामानुजन स्थानिक सरकारी शाळेत जायचे. वयाच्या 11 व्या वर्षापर्यंत गणितातील हुशार विद्यार्थी असा नावलौकिक त्यांनी मिळवला होता. पाचवीत असतानाच ते कॉलेजमधल्या अभ्यासक्रमातील गणितं सोडवायचे. तेव्हाच ते त्रिकोणमिती (Trigonometry) शिकले आणि वयाच्या 13 व्या वर्षापर्यंत ते त्रिकोणमितीत प्रवीण झाले होते. शाळेत रामानुजन त्यांच्याबरोबरच्या विद्यार्थ्यांना मदत करायचेच पण त्यांच्या शिक्षकांनाही गणितातल्या काही अडचणी असतील तर त्या सोडवून द्यायचे. गणिताच्या आवडीमुळे गमावली शिष्यवृत्ती गावातल्या माध्यमिक शाळेतून 1904 मध्ये त्यांनी शालांत परीक्षा दिली. शाळेचे मुख्याध्यापक कृष्णस्वामी अय्यंगार यांनी गणितातील प्रावीण्यासाठी त्यांना के. रंगनाथ राव बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला होता. कुंभकोणममधल्या सरकारी कला महाविद्यालयात शिकण्यासाठी त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली होती पण त्यांना इतर कुठल्याच विषयात रूची नव्हती. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या परीक्षेत ते गणित सोडून इतर सर्व विषयांत नापास झाले, म्हणून त्यांना शिष्यवृत्तीही गमवावी लागली. कॉलेजात प्रवेश त्यावेळच्या मद्रासमधील पचैयप्पा कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला पण 1906 ला कला विषयात नापास झाले आणि 1907 मध्ये त्यांना इतर कुठला विषय शिकायची इच्छाच राहिली नाही. गणितातही केवळ कठीण प्रश्न सोडवायलाच त्यांना आवडायचं. त्यांनी आपल्या मनाचं ऐकलं आणि गणिताचा अभ्यास करत राहिले. व्ही. रामस्वामी अय्यर यांची भेट रामानुजन यांची 1910 मध्ये व्ही. रामस्वामी अय्यर यांच्याशी भेट झाली. अय्यर यांनी इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीची स्थापना केली होती. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर हळूहळू मद्रासमधल्या गणितज्ज्ञांच्या वर्तुळात रामानुजन यांनी आपली ओळख निर्माण केली. गणितातील अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना मद्रास विद्यापीठात गणितातील संशोधकाच्या पदावर काम करायची संधी मिळाली. सादरीकरणामुळे अपयश आपल्यालाही अनेकदा अनुभव येतो की आपल्याला त्या विषयाची माहिती, ज्ञान पुरेपूर असतं पण त्याची मांडणी म्हणजेच प्रेझेंटेशन करण्यात आपण कमी पडतो. रामानुजन यांनी ब्रिटिश गणितज्ज्ञांना आपले अनेक लेख पाठवले होते, पण सादरीकरण चांगलं नसल्यामुळे त्यांनी ते नाकारले, कॅम्ब्रिज विद्यापीठातील दोन प्राध्यापकांनीही त्यांचं संशोधन परत पाठवलं होतं, पण प्रा. जी. एच. हार्डी यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली. 3900 प्रश्नांची उकल रामानुजन यांच्या काही धार्मिक मान्यतांमुळे पहिल्यांदा त्यांनी भारत सोडून इंग्लंडला जाण्यास नकार दिला होता, पण अखेर त्यांनी विचार बदलला. रामानुजन यांच्या अफाट बुद्धिमत्तेबद्दल ते म्हणत की ही मला मिळालेली दैवी देणगी आहे त्यामुळेच माझ्या प्रश्नांची उकल मी करू शकतो. रामानुजन यांनी उभ्या आयुष्यात 3900 गणिती संकल्पनांची उकल केली. मॅथेमॅटिकल अनॅलिसिस (mathematical analysis), नंबर थिअरी (number theory), इनफायनाइट सीरिज (infinite series), आणि कंटिन्यूड फ्रॅक्शन्स (continued fractions) या विषयांत रामानुजन यांनी विशेष योगदान दिलं. रामानुजन प्राइम (Ramanujan prime), रामानुजन थीटा फंक्शन (Ramanujan theta function), पार्टिशन फॉर्म्युले (partition formulae) आणि मॉक थीटा फंक्शन्स (mock theta functions) या विषयांतील त्यांच्या संशोधनामुळे गणितातील संशोधनाच्या नव्या वाटा खुल्या झाल्या. रामानुजन नंबर - मॅजिक नंबर रामानुजन यांनी संशोधन करून निश्चित केलेला 1729 हा अंक रामानुजन नंबर किंवा मॅजिक नंबर (Magic Number) म्हणून ओळखला जातो. दोन वेगवेगळ्या अकांच्या गटांच्या घनांची बेरीज केली तर लिहिता येणारी सर्वांत लहान संख्या आहे. रामानुजन स्क्वेअर हे असं कोडं आहे, ज्यामुळे सगळेच चकित होतात. प्रखर बुद्धिमत्तेचा मालक असलेल्या रामानुजन यांना मात्र आयुष्यभर प्रकृती अस्वास्थ्याने बेजार करून टाकलं होतं. एक तर गरिबी आणि धार्मिक श्रद्धांमुळे त्यांनी आहारावर घालून घेतलेल्या बंधनांमुळे त्यांची तब्येत आणखी खालावली. 1920 मध्ये वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी जगाने हा महान गणितज्ज्ञ गमावला. रामानुजन यांच्या गणितातील योगदानाचं स्मरण राहावं आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो.
First published:

पुढील बातम्या