नासा म्हणतंय, आम्ही नाही भारतीय इंजिनिअरने 2 महिने आधीच शोधला लँडर विक्रम

नासा म्हणतंय, आम्ही नाही भारतीय इंजिनिअरने 2 महिने आधीच शोधला लँडर विक्रम

चांद्रयान 2 मोहिमेत संपर्क तुटलेल्या विक्रम लँडर भारतीय इंजिनिअरने 2 महिने आधीच शोधला होता. आता नासानेही त्यांच्या संकेतस्थळावर ही गोष्ट सांगितली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 डिसेंबर: भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेत अखेरच्या क्षणी विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. हार्ड लँडिंगमुळे चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरताच विक्रमशी संपर्क तुटल्यानंतर त्याचा शोध इस्त्रो घेत होती. त्याच्याशी पुन्हा संपर्क करण्यासाठी लँडिगनंतर 14 दिवसांचा कालावधी होता. पण त्या काळात विक्रम लँडर सापडला नाही आणि त्याच्याशी संपर्कही झाला नाही. दरम्यान, आता विक्रम लँडर कुठं आहे ते शोधण्यात नासाच्या ऑर्बिटरला यश आलं आहे. विशेष म्हणजे नासाला आपण विक्रम लँडरचा फोटो काढला आहे याची कल्पनाच नव्हती. एका भारतीयानेच विक्रम लँडरचा ठावठिकाणा शोधून काढला.

नासाने भारतीय अभियंता शन्मुगा सुब्रमनियम याला विक्रम लँडर शोधण्याचं श्रेय दिलं होतं. 3 ऑक्टोबरलाच सुब्रमनियमने विक्रम लँडरचा ठावठिकाणा स्पष्टीकरणासह सांगितला होता. याबाबत नासानेही त्यांच्या संकेतस्थळावर ही गोष्ट नमूद केली आहे. शन्मुगाने दोन फोटो ट्विट केले होते. त्यापैकी एक फोटो 2017 चा होता आणि एक फोटो सध्याचा. यात त्याने नव्या फोटोत दिसणारा पांढरा ठिपका हा विक्रम लँडर असू शकतो हे असं म्हटलं होतं. त्यासाठी त्यानं इमेजचे पिक्सेल आणि विक्रम लँडरचे आकारमान याची गणितीय मांडणीही केली होती. त्याच्या आधारे हा विक्रम लँडर असण्याची शक्यता शन्मुगाने व्यक्त केली होती. त्यानंतर नासाने दोन महिन्यांनी विक्रम लँडर सापडल्याची माहिती दिली.

भारतीय इंजिनिअर शन्मुगाने न्यूज 18 शी बोलताना सांगितले की, विक्रम लँडरचा शोध घेण्यात मला योगदान देता आलं याचा मला आनंद झाला आहे. नासाने टिपलेले फोटो वापरून त्याचे निरीक्षण केलं. त्यानंतर माझ्या निरीक्षणाच्या नोंदी नासा आणि इस्रोला पाठवल्या. चंद्रावर असलेल्या अवशेषांना शोधणं कठिण आहे कारण त्याचा फक्त एक ठिपका दिसते. एक महिन्यापूर्वी नासाला मला मिळालेली माहिती पाठवली त्यानंतर त्यांच्याकडून खात्री होण्याची वाट पाहिली. विक्रमचे हार्ड लँडिंग झालं यामुळे थोडं वाईट वाटलं पण लोक इस्रो आणि लँडरची चर्चा करत आहेत ही सकारात्मक गोष्ट आहे. मला वाटतं की आपली मोहिम यशस्वी झाली.

विक्रम लँडर जिथे उतरणं अपेक्षित होतं त्यापेक्षा त्याचा खुणा जवळपास 750 मीटर दूर अंतरावर सापडल्या आहेत. त्यामुळे विक्रम लँडरचं हार्ड लँडिग झालं असल्याचा अंदाज या फोटोतून खरा होत असल्याचं दिसत आहे. नासानं ट्वीट करून ही माहिती दिली आहे. 7 सप्टेंबर रोजी इस्त्रोकडून चांद्रयान 2 अंतराळात पाठवण्यात आलं होतं. लँडर विक्रम चंद्रापासून 2 किमी अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला. त्यानंतर चंद्राच्या कक्षेत असलेल्या ऑर्बिटरनं विक्रम साधारण कुठे पडलेलं असू शकतं याचे संभाव्य फोटो इस्रोला पाठवले होते.

नासाने मंगळवारी पहाटे ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. नासाच्या लूनर रिकॉनिसेंस ऑर्बिटरद्वारे हे छायाचित्र काढण्यात आलं आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातील काही फोटो समोर आले होते. मात्र फिक्सेल चांगले नसल्यामुळे विक्रम लँडरची पडताळणी करणं कठीण होतं. नोव्हेंबर महिन्यात मोजेक चांगल्या पद्धतीनं साथ देत असल्यामुळे काही छायाचित्र साधारण स्पष्ट होतील अशी समोर आली आहे. पण आता ऑर्बिटरने काल या ठिकाणाचे नव्याने फोटो घेतले आहेत.

विक्रम लँडरसोबत संपर्क इस्रोसोबत संपर्क तुटल्यानंतर त्याचं हार्ड लँडिंग झालं असावं असा एक कयास इस्रोच्या शास्रज्ञांनी 07 सप्टेंबर रोजी व्यक्त केला होता. नासाने केलेल्या ट्वीटमधून विक्रम लँडरचं हार्ड लँडिंग झालं असावं हे दिसून येत आहे.

संसदेत चंद्रयान-2 बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लिखित उत्तर दिलं होतं. 7 सप्टेंबरला विक्रम लँडरच्या लँडिग दिवशी चंद्रापासून 30 किलोमीटर ते 7.4 किलोमीटरपर्यंतचा प्रवास सुरळीत होता. यावेळी विक्रम लँडरचा वेग 1683 मीटर प्रतिसेकंदावरून 146 मीटर प्रति सेकंदावर आला होता. मात्र तिथून पुढे दुसऱ्या टप्प्यात विक्रम लँडरचा वेग नियोजित वेगापेक्षा जास्त होता. त्यामुळे विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग होऊ शकले नाही. चंद्रापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचे हार्ड लँडिंग झाले, असे सिंह यांनी सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nasa
First Published: Dec 3, 2019 10:56 AM IST

ताज्या बातम्या