नवी दिल्ली, 30 मे: नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपध घेणार आहेत. भारतातील आणि विदेशातील मिळून 8 हजार लोकांच्या उपस्थितीत संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. राजधानी दिल्लीत अशा प्रकारचा भव्य कार्यक्रम प्रथमच होत आहे. पंतप्रधानांनी शपथविधीसाठी ज्यांना बोलवले आहे त्यामध्ये BIMSTEC देशांचे नेते, देशातील सर्व विरोधी पक्षांचे नेते, क्रीडा आणि सिनेसृष्टीतील व्यक्तींचा समावेश आहे. सर्वसाधारणपणे पंतप्रधानांच्या शपथविधीसाठी 3 हजार 500 ते 5 हजार लोकांना बोलवले जाते. पण यंदा प्रथमच 8 हजार लोकांना बोलवण्यात आले आहे.
BIMSTEC देशातील नेते
राष्ट्रपती भवन परिसरात होणाऱ्या भव्या कार्यक्रमासाठी अनेक राजकीय नेते येणार आहेत. यातील काही नेते परदेशातील देखील आहेत. BIMSTEC देशांच्या नेत्यांमध्ये बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हमीद, श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपला सिरीसेना, नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली, म्यानमारचे राष्ट्रपती यू विन म्यिंट आणि भूतानचे पंतप्रधान लोते त्शेरिंग हे नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. थायलंडमधून विशेष दूत ग्रिसाडा बूनरॅक येणार आहेत. याशिवाय किर्गीचे राष्ट्रपती शांघायचे प्रमुख आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जुगनॉथ यांना देखील आमंत्रण दिले आहे.
विरोधी पक्षनेते देखील उपस्थित राहणार
मोदींच्या शपथविधीसाठी संपूर्ण विरोधी पक्षातील नेते देखील उपस्थित असतील. सर्व राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपालांसह विरोधी पक्षातील नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग, टीएमसीच्या प्रमुख व बंगालच्या प्रमुख ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांचा देखील समावेश आहे.
क्रीडापटू देखील येणार
शपथविधी कार्यक्रमासाठी माजी धावपटू पी.टी.उषा, माजी क्रिकेटपटू राहुल द्रवीड, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, हरभजन सिंग, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि जिमनॅस्टिकपटू दीपा कर्माकरसह अनेक क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रण पाठवण्यात आले आहे.
याशिवाय चित्रपट क्षेत्रातील शाहरुख खान, कंगना रनौत, संजय लीला भंन्साळी, करण जोहर, सुपरस्टार रजनीकांत यांना आमंत्रण दिले गेले आहे. उद्योग जगतातील अंबानी, अडानी आणि टाटा कुटुंबियांसह अन्य मोठ्या उद्योजकांना बोलवण्यात आले आहे. यात अजय पीरामल, जॉन चेबर्स आणि बिल गेट्स यांचा समावेश आहे.
VIDEO: हॅन्डल लॉक तोडून बुलेट पळवली, चोरीची घटना CCTVमध्ये कैद