नवी दिल्ली, 03 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया अकाऊंट सोडणार नाहीत. तर 8 मार्चपासून महिलांना मोदींचं ट्वीटर अकाऊंट चालवण्यासाठी देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ट्वीट करत मोदींनी यासंबंधी माहिती दिली आहे. खरंतर आपण सगळे सोशल मीडिया अकाऊंट सोडणार असल्याचं ट्वीट मोदींनी सोमवारी केलं होतं. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता मोदींनी खुलासा केला आहे.
'यंदाच्या महिला दिनी, ज्या महिलांचे जीवन आणि कार्य आम्हाला प्रेरणा देते अशा महिलांना मी माझे सोशल मीडिया अकाऊंट चालण्यासाठी देणार आहे. यामुळे त्यांना लाखो लोकांना प्रेरणा देण्यास मदत होईल. तुम्हीही अशा प्रेरणादायी आहात किंवा तुमच्या ओळखीत अशा कोणी प्रेरणादायी महिला असेल तर त्यांच्या स्टोरीज #SheInspiresUs.ने शेअर करा' असं मोदींनी ट्वीट करत म्हटलं आहे.
This Women's Day, I will give away my social media accounts to women whose life & work inspire us. This will help them ignite motivation in millions.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. मात्र याच सोशल मीडियासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे.
'या रविवारी मी ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब यावरील माझी खाती सोडण्याचा विचार करत आहे,' असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदींनी असं अचानक सोशल मीडिया सोडण्याचा विचार व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
This Sunday, thinking of giving up my social media accounts on Facebook, Twitter, Instagram & YouTube. Will keep you all posted.
दरम्यान, नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले जाणारे राजकीय नेते आहेत. इंस्टाग्रामवर 3 कोटी 52 लाख, ट्विटरवर 5 कोटी 33 लाख आणि फेसबुकवर 4 कोटी 45 लाख लोक मोदींना फॉलो करतात, तर नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनेलला 45 लाख सबस्क्राईबर आहेत.
राहुल गांधींचा मोदींना टोला
पंतप्रधान मोदींनी असं ट्वीट करताच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी त्यांना टोला लगावला आहे. 'सोशल मीडिया नाही...द्वेष सोडा,' असं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.
राहुल गांधीही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांचे ट्विटवरवर 12.1 मिलियन फॉलोअर्स तर फेसबुकवर 3 मिलियन फॉलोअर्स आहेत. फोटोसाठी लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्रामवरही राहुल गांधींचे अकाउंट आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे 9 लाख 87 हजार फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर राहुल गांधींच्या नावाने चॅनेल आहे. या चॅनेलचेही 1 लाख 68 हजार सबस्क्रायबर्स आहेत.