पंढरपूर 12 मे : पंतप्रधान हे देशात दुफळी करणारे नेते नाहीत तर युनिटी करणारे नेते आहेत असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. आठवले यांनी पंढरपूर जवळच्या चारा छावण्यांना भेटी दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशात मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत टाइम मासिकाने देशात दुफळी करणारे नेते असं म्हटलं आहे. मात्र मोदी हे देशात युनिटी करणारे नेते आहेत. त्यांचा सारखाच कणखर नेता या देशाला पाहिजे आहे.
कधी काय होत याचा अंदाज शरद पवार यांना येतो. म्हणूनच बारामती लोकसभा मतदारसंघातील निकालाबाबत त्यांनी भिती व्यक्त केली होती. जर एनडीए सरकार आले तर मुंबई आणि कोकणातील नद्यांचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले. दुष्काळी दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून परिस्थितीची माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
चारा छावणी सुरू करण्यासाठी पाच लाख डीपॉझीट जमा करण्याची अट काढून टाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याच आठवले म्हणाले. अशा नियमांमुळे चारा छावणी सुरू होण्यासाठी विलंब होत असल्याच्या तक्रारी असल्याचं त्यांनी सांगितंल.