नवी दिल्ली, 30 मे : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे या सरकारमधील नव्या मंत्रिमंडळाबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. यावेळी मंत्रिमंडळात अनेक धक्कादायक बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 7 वाजता दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. यावेळी त्यांच्यासोबत इतर काही मंत्रीही पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. पण या मंत्रिमंडळात अनेक नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपावण्यात येईल, असं म्हटलं जात आहे. तसंच अनेक गोष्टींबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.
अर्थमंत्रालयाची धुरा कुणाच्या खांद्यावर?
नरेंद्र मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये अर्थमंत्री म्हणून अरूण जेटली यांनी काम पाहिलं. पण प्रकृतीच्या कारणास्तव आपण आता सरकारमध्ये भूमिका बजावू इच्छित नाही, असं अरूण जेटली यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे या अत्यंत मंत्रालयाची जबाबदारी नक्की कुणाकडे सोपवली जाणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे.
अमित शहांकडे कोणती जबाबदारी?
भाजपचे विद्यमान अध्यक्ष यांनी पक्षाला लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवून देत आपलं संघटन कौशल्य दाखवून दिलं आहे. पण आता सरकारमध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येईल, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीर त्यांच्याकडे नक्की कोणती मंत्रिपद दिलं जात, हे पाहणं औत्सुक्याचा ठरणार आहे.
ममतांना शह देण्यासाठी नवी खेळी?
पश्चिम बंगालमध्ये यावेळी भाजपने चांगलं यश मिळवत ममता बॅनर्जी यांना चांगलंच आव्हान दिलं आहे. या राज्यात पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी इथल्या खासदारांना मंत्रिपदं देण्याचा डाव भाजपकडून खेळला जाऊ शकतो.
स्मृती इराणींना कोणतं बक्षीस मिळणार?
अमेठी या गांधी घराण्याच्या अभेद्य समजल्या जाणाऱ्या बालेकिल्ल्याला स्मृती इराणी यांनी सुरुंग लावला. त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात त्यांचं वजन वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे नक्की कोणतं मंत्रिपद दिलं जाणार, हे पाहावं लागेल.
शिवसेनेचं काय होणार?
एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशात शिवसेनेचाही मोठा वाटा आहे. त्यामुळेच मंत्रिपदासह लोकसभेचे उपसभापती पदही शिवसेनेला दिलं जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मुंबई अशा सर्व विभागांना प्रतिनिधित्व देण्यासाठी या भागातील खासदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई, विनायक राऊत, भावना गवळी यांची नावं आघाडीवर आहेत.
VIDEO : मोदींच्या मंत्रिमंडळात 'या' मराठी नेत्यांची लागणार वर्णी