'राजीव गांधींमुळेच मी जिवंत आहे', अटलबिहारी वाजपेयींनी केली होती प्रशंसा

'राजीव गांधींमुळेच मी जिवंत आहे', अटलबिहारी वाजपेयींनी केली होती प्रशंसा

नरेंद्र मोदींनी राजीव गांधींवर टीका केली असली तरी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मात्र राजीव गांधींबद्दल गौरवोद्गार काढले होते. मी राजीव गांधी यांच्यामुळे जिवंत आहे, असं वाजपेयी यांनी म्हटलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींचा उल्लेख भ्रष्टाचारी नंबर वन असा केला आणि त्यावरून बरीच टीका झाली. राजीव गांधींबद्दल असं वक्तव्य करून नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचा मान राखला नाही, असंही विरोधकांचं म्हणणं आहे.

भाजपचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मात्र राजीव गांधींबद्दल गौरवोद्गार काढले होते. मी राजीव गांधी यांच्यामुळे जिवंत आहे, असं वाजपेयी यांनी म्हटलं होतं.

किडनीचा आजार

1991 मध्ये अटलबिहारी वाजपेयींना मूत्रपिंडाचा आजार झाला होता. त्यावर उपचार करण्यासाठी त्यांना अमेरिकेला जावं लागणार होतं पण आर्थिक चणचणीमुळे ते अमेरिकेला जाऊ शकत नव्हते.

राजीव गांधींना हे कुठून कळलं माहीत नाही पण त्यांनी अटलबिहारी वाजपेयींना त्यांच्या कार्यालयात बोलवलं आणि त्यांना सांगितलं, 'संयुक्त राष्ट्रात भारताचं जे प्रतिनिधीमंडळ जाणार आहे त्यामध्ये तुमचा समावेश करण्यात येईल.'असं झालं तर वाजपेयी त्यांच्या आजारावर इलाज करू शकतील हे राजीव गांधींना माहीत होतं.

न्यूयाॉर्कमध्ये उपचार

अटलबिहारी वाजपेयी न्यूयॉर्कला गेले आणि उपचार करून घेतल्यामुळे बरेही झाले. पण या घटनेबद्दल वाजपेयी किंवा राजीव गांधी या दोघांनीही कुणालाही सांगितलं नाही.

आपल्या राजकीय जीवनात दोघंही त्यांचं काम करत होते. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्षनेते होते. त्या नात्याने ते कितीतरी वेळा राजीव गांधींवर टीका करायचे. पण यामुळे या दोघांच्या संबंधांमध्ये कधीच बाधा आली नाही.

राजीव गांधींच्या हत्येनंतर...

राजीव गांधींची जेव्हा हत्या झाली तेव्हा एका पत्रकाराने अटलबिहारी वाजपेयींना राजीव गांधींबद्दल विचारलं तेव्हा भावूक होऊन वाजपेयींनी राजीव गांधींच्या चांगुलपणाची ही गोष्ट सांगितली.

राजकारणात कुणी कुणाचा मित्र नसतो किंवा शत्रूही नसतो, असं म्हणतात. पण विरोधक असले तरी त्यांच्याशी माणुसकीच्या नात्याने कसं वागायचं याची सभ्यता जेवढी वाजपेयींकडे होती तेवढीच राजीव गांधींकडेही होती.

लोकसभा निवडणुकीच्या राजकारणात एकमेकांवर जहरी टीका करणाऱ्या नेत्यांसाठी ही खरंच खूप मोठी शिकवण आहे.

=================================================================================

VIDEO : राज ठाकरे शिवसेना सोडताना संपर्कात होते, नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

First published: May 8, 2019, 6:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading