नवी दिल्ली : कुठल्याही व्यक्तीचं नाव ही तिची ओळख असते, त्यामुळं नामकरण करताना अतिशय विचार करून नाव दिलं जातं. आपलं नाव ही आपली वैयक्तिक ओळख असते. मात्र, एखाद्या गावाचं नाव (Village Names) हे त्या गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख ठरते. गावांना कित्येक शतकांपूर्वी नावं दिलेली असतात आणि सरकार दफ्तरीदेखील त्यांची तशीच नोंद असते. आपल्या देशांतील काही गावांची नावं इतकी विचित्र (Weird Names) आणि मजेशीर (Funny Names) आहेत की, ती पहिल्यांदा ऐकल्यानंतर हसू आवरता येत नाही. त्या गावाबाहेरील लोकांना गंमत वाटते मात्र, गावातील रहिवाशांना या गोष्टीची लाज वाटते.
झारखंडमधील (Jharkhand) देवघर (Deoghar) जिल्ह्यातील मोहनपुर तालुक्यातील बंका पंचायतीअंतर्गत येणाऱ्या गावाचं नाव देखील विचित्र होतं. या विचित्र नावामुळं गावातील आत्ताच्या पिढीतील मुलांना शाळा-कॉलेजमध्ये आपल्या गावाचं नाव सांगायला देखील लाज वाटत होती. त्यामुळं गावातील नागरिकांनी प्रयत्न करून या गावाचं नावच बदलून टाकलं आहे. इतकच नाही तर त्यांनी सरकार दफ्तरी तशी नोंद देखील करवून घेतली आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील बंका पंचायतीअंतर्गत एक विचित्र नावाचं गाव होतं. या विचित्र नावामुळं गावातील लोकांची चेष्टा केली जाई. याचा सर्वात जास्त मनस्ताप गावातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत होता. त्या गावाचं नाव ‘भो...या’ होतं. हिंदी भाषेत याच नावाची एक घाणेरडी शिवी आहे. त्यामुळे बाहेर शिकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या जातीचा दाखला (Caste certificate), रहिवासी दाखला (Resident certificate), उत्पन्नाच्या दाखल्यावरील (Income certificate) गावाचं नाव पाहून त्यांची खिल्ली उडवली जात असे. यासर्व प्रकारामुळं गावातील नागरिक चिंतेत होते. गावातील तरुणांनी पंचायतीच्या मदतीनं आपल्या गावाचं नावच बदलून टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीनं प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून आता त्यांच्या गावाचं नाव 'मसुरिया' (Masuria Village) असं करण्यात आलं आहे. बांका पंचायतीचे प्रमुख रणजितकुमार यादव यांनी गावातील सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये नवीन नाव लावून घेण्यासाठी एक ग्रामसभा बोलावली. गावाचं जुनं नाव बदलून नवीन नाव ठेवण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर सर्व सरकारी कार्यालये आणि कागदपत्रांमध्ये 'मसुरिया' या नवीन नावाची नोंद करण्यात आली आहे.
महसूल विभागाच्या संकेतस्थळावरून देखील गावाचं जुनं नाव हटवून त्याजागी नवीन नाव टाकण्यात आलं आहे. आता गावातील नागरिक नवीन नावासह जमिनीचा महसूल भरतात. सर्कल ऑफिस, पोलीस स्टेशन आणि ब्लॉक ऑफिसच्या अंतर्गत येणाऱ्या गावांच्या यादीत मसुरिया असं नाव नोंदवलं गेलं आहे. ब्लॉक ऑफिसमधून चालत असलेल्या विकास आराखड्यातही मसुरिया नावाची नोंद आहे. आता शाळा-महाविद्यालयांमध्ये जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांना जात, रहिवासी आणि उत्पन्नाचे दाखलेही मसुरियाच्या नावानं दिले जात आहेत.
प्रभात खबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बांका पंचायतीचे (Banka Panchayat) प्रमुख रणजित कुमार यादव म्हणतात की, जुन्या पत्रकात गावाचं नाव आक्षेपार्ह होतं. त्यामुळं आम्ही गावाचं नाव बदलून घेतलं आहे. आता पंतप्रधान आवास योजनेसह (PMAY) इतर योजना देखील मसुरिया नावानं मंजूर होत आहेत.
आतापर्यंत राजस्थान (Rajasthan), हरियाणा (Haryana), महाराष्ट्र (Maharashtra) आणि झारखंड (Jharkhand) मधील अनेक गावातील नागरिकांनी गावांची नावं बदलण्यासाठी संघर्ष केलेला आहे. त्यात काहींना यश आलं आहे तर काहींचे अद्याप प्रयत्न सुरूच आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jharkhand