मुंबई, 10 ऑक्टोबर: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलेली मुदत संपली. दोन्ही गटांनी निवडणूक चिन्ह आणि नावांवरती तीन पर्यायाचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातील कायदे विभाग या 3 पर्यायाच्या प्रस्तावावरती विस्ताराने चर्चा करू आजच निर्णय देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाकडून नाव आता समोर आली आहे.
शिंदे गटाचीही रविवारी रात्री बैठक झाली असून यात निवडणूक चिन्हासाठी तलवार, तुतारी आणि गदा या चिन्हांचा विचार सुरू असल्याचं समोर आलं आहे. तर शिंदे गटाकडून तीन नावं सुद्धा ठरली आहे. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी 3 नावं निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
('56 वर्षात कोणालाही जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं', सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा 'बाण')
दरम्यान, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यामुळे शिवसेनेनं दुसरं चिन्ह मिळवण्यासाठी तयारी केली. त्रिशूळ, उगवता सूर्य आणि तिसरा धगधगती मशाल. तीन नावं शिवसेनेनं तात्पुरत्या वेळासाठी निवडणूक आयोगाकडे पाठवली. त्यातील पहिलं नाव हे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, तिसरं उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे", असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. शिवसेनेकडून ही तिन्ही नावं आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. पण, उगवता सूर्य आणि त्रिशूळ दोन्ही चिन्ह नाकारली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग दोन्ही चिन्ह नाकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदे आणि ठाकरे गटाकडून उगवता सूर्य आणि त्रिशूळ या दोन्ही चिन्हांवर दावा केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकाच वेळी जर एकाच चिन्हावर दोन्ही गटाने दावा केला तर चिन्ह बाद केले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.