मराठी बातम्या /बातम्या /देश /नागालँडमध्ये राष्ट्रवादी-भाजप एकत्र का? शरद पवारांनी सांगून टाकलं 'अंडरस्टॅण्टिंग'

नागालँडमध्ये राष्ट्रवादी-भाजप एकत्र का? शरद पवारांनी सांगून टाकलं 'अंडरस्टॅण्टिंग'

नागालँडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र, पवारांनी सांगितलं कारण

नागालँडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र, पवारांनी सांगितलं कारण

महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप युतीला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 मार्च : महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप युतीला पाठिंबा जाहीर केला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीपीपी-भाजप युतीला 37 जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं होतं. एनडीपीपी या पक्षाला नागालँडमध्ये 25 आणि भाजपला 12 जागांवर विजय मिळाला होता. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीपीपी-भाजपला स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार निवडून आले आहेत.

शरद पवारांनी सांगितलं कारण

नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत एकत्र का आलं? याचं कारण शरद पवारांनी सांगितलं आहे. 'निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. निवडणुकीच्या काळात तिथल्या मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा होता. आमचा पाठिंबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आहे, त्यामुळे भाजपसोबत आम्ही युती केलेली नाही,' असं शरद पवार म्हणाले आहेत.

'आमचं अंडरस्टॅण्टिंग त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांसोबत आहे. नागालँडचं एकंदरीत चित्र बघितल्यानंतर त्याठिकाणी एक प्रकारची स्थिरता येण्यासाठी आमची मदत त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना होत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा आहे, पण भाजप म्हणून नाही,' असं पवारांनी स्पष्ट केलं.

'मला आश्चर्य वाटतं, मेघालय आणि शेजारच्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीच्या प्रचारात देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघं गेले होते. पंतप्रधानांनी मेघालयच्या प्रचारामध्ये त्या ठिकाणचे मुख्यमंत्री आणि राज्यकर्ते भ्रष्टाचारी आहेत, असं म्हणत त्यांचा पराभव करा, असं म्हणलं होतं. निवडणुकींचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्यासोबत सहभागी झाले आणि मंत्रिमंडळात त्यांच्या सदस्यांचा सहभागही आहे, ही आमची भूमिका नाही,' असं म्हणत पवारांनी भाजपवर टीका केली.

नागालँड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 7, एनपीपीचे 5, एलजेपी (रामविलास), नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) आणि आरपीआय (आठवले) यांचे दोन-दोन आमदार तसंच जेडीयूचा एक, अपक्ष चार आमदारांचा विजय झाला आहे. नागालँडमध्ये जिंकलेल्या सगळ्याच पक्षांच्या आमदारांनी एनडीपीपी-भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे नागालँडमध्ये विरोधक नसलेलं सरकार स्थापन होणार आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, NCP, Sharad Pawar