मराठी बातम्या /बातम्या /देश /ऐतिहासिक स्थापत्यकला असलेला जुनागड पहायला जाताय? मग ही ठिकाणं आवर्जून पहाच

ऐतिहासिक स्थापत्यकला असलेला जुनागड पहायला जाताय? मग ही ठिकाणं आवर्जून पहाच

Photo Credit : Rishad Saam Mehta

Photo Credit : Rishad Saam Mehta

गुजरातमध्ये येणाऱ्या पर्यटकांनी आवर्जून या भागाला भेट द्यावी.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Junagadh, India

  नवी दिल्ली, 4 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राज्य म्हणून गुजरातची एक वेगळी ओळख सध्या निर्माण झाली आहे. मात्र ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्याही गुजरातची स्वतंत्र ओळख आहे. भारताच्या पश्चिमेकडे असलेलं हे राज्य विविधतेनं नटलेलं आहे. गुजरातमधला जुनागड जिल्हा अनेकविध वैशिष्ट्यांनी सजलेला आहे. गुजरातमध्ये येणाऱ्या पर्यटकांनी आवर्जून या भागाला भेट द्यावी. ‘नॅटजिओट्रॅव्हलर’नं त्याबाबत विशेष वृत्त दिलं आहे. जुनागढमध्ये ऐतिहासिक स्थापत्यकलेचे अनेक सुंदर नमुने पाहायला मिळतात. या भागातले किल्ले, लेणी आणि मुघलकालीन मीनार तिथल्या इतिहासाचे साक्षीदार आहेत.

  उपरकोट किल्ला

  जुनागढमधला उपरकोट किल्ला चंद्रगुप्त मौर्य काळात म्हणजे साधारणपणे इसवी सनाआधी 319 मध्ये बांधला गेला असावा, असा इतिहासतज्ज्ञांचा अंदाज आहे. किल्ल्यामध्ये जाताना दरवाज्याजवळ लाकूड आणि लोखंडी पट्ट्यांनी बांधलेल्या लोखंडी चकत्या दिसतात. शत्रूच्या हत्तींपासून संरक्षणासाठी त्या तिथं लावण्यात आल्या असाव्या. ठिकठिकाणी शत्रूच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी काही क्लृप्त्या वापरून बांधकाम केलेलं आढळतं.

  अर्थात किल्ल्याला 16 वेळा वेढा पडला, मात्र किल्ला कोणी जिंकू शकलं नाही. हल्लेखोरांवर उकळत्या तेलानं किंवा दगडांनी वरून मारा करता येईल, अशी किल्ल्यावर रचना करण्यात आली आहे. किल्ल्यावर गेल्यावर एका छोट्याशा चौकात ‘नीलम’ नावाची एक तोफ दिसते. शहरावर लक्ष ठेवण्यासाठी ती तिथे ठेवण्यात आलीय. सध्या तिचं तोंड बंद करून ठेवलेलं आहे. ही तोफ इजिप्शियन साच्यातली असून 16 व्या शतकात पोर्तुगीज आणि ऑटोमन्स यांच्यातल्या सागरी युद्धादरम्यान तुर्कीच्या अ‍ॅडमिरलनं ती तोफ दीवच्या सौराष्ट्र किनारपट्टीवर सोडली होती. 1962 पासून ती तोफ किल्ल्यावर ठेवण्यात आली.

  किल्ल्यावर काही बौद्ध लेणीही आहेत. ही लेणी इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात कोरली गेली असावी. तिथे सापडलेली नाणी आणि मुद्रा चौथ्या शतकातल्या आहेत. त्या लेण्यांमध्ये गेल्यावर गारवा जाणवतो. किल्ल्यावर दोन मोठ्या विहिरी आहेत. 15 व्या शतकातली आडी-चाडी वाव आणि नवघन कुवो या खूप भव्य आहेत. आडी-चाडी वावचा रस्ता सैन्याला लपण्यासाठीच नाही, तर अचानक शत्रूवर वेगानं हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आलाय. सध्या विहिरींमधल्या पाण्यावर शेवाळं साचलं आहे, मात्र एकेकाळी या पाण्यावर किल्ल्यातल्या संपूर्ण लोकांचं जीवन अवलंबून होतं. या किल्ल्यात जायला सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत प्रवेश असतो. भारतीय पर्यटकांना 5 रुपये तर परदेशी पर्यटकांना 100 रुपये प्रवेश फी आहे.

  हेही वाचा - Makar Sankrant : हलव्याच्या दागिन्यांमध्ये यंदा काय आहे ट्रेन्डिंग? पाहा Video

  महाबत मकबरा

  हा मकबरा 19 व्या शतकात बांधला गेला आहे. त्यावरचे घुमट, स्तंभ आणि नाजूक कोरीव कामांवर मुस्लीम, गॉथिक आणि युरोपियन स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसतो. या मकबऱ्याच्या मीनारांभोवती असलेल्या गोल वर्तुळाकार नाजूक पायऱ्या हे याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. इथे पर्यटकांना मोफत प्रवेश आहे.

  सम्राट अशोकाचा शिलालेख

  जुनागढमध्ये सम्राट अशोकाचे काही शिलालेखही आढळतात. गिरनार पर्वताकडे जाताना हा शिलालेख पाहायला मिळतो. सम्राट अशोकानं कलिंगच्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्माच्या ज्ञानाबाबत सम्राट अशोकानं 14 शिलालेख लिहिले. ते भारतीय उपखंडात विखुरले गेले आहेत. त्यापैकीच एक शिलालेख गिरनार पर्वताजवळ आहे. हा शिलालेख एका महालात ग्रॅनाईटच्या दगडावर कोरलेला आहे. नंतर त्या महालाच्या भिंतींवर त्या शिलालेखाचा गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेतला अनुवाद लिहिण्यात आला आहे.

  शिलालेख पाहण्यासाठी सकाळी 8 ते रात्री 6 वाजेपर्यंत जाता येतं. भारतीय पर्यटांसाठी 5 रुपये व परदेशी पर्यटकांसाठी 100 रुपये प्रवेश फी आहे. या भागातच 10 हजार पायऱ्यांचा गिरनार पर्वत आहे. पर्वतावर 12 व्या शतकातलं नेमीनाथ मंदिर आहे. जुनागढला बस, गाडी, रेल्वे किंवा विमानानं जाता येतं. स्थानिक बस किंवा रिक्षानं पर्यटनस्थळं पाहता येऊ शकतात. या भागात फिरण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ चांगला मानला जातो.

  First published:

  Tags: History