मुस्लीम देशांनी टाकला फ्रान्सवर बहिष्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटला नवा वाद

मुस्लीम देशांनी टाकला फ्रान्सवर बहिष्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटला नवा वाद

पैगंबरांची कार्टून प्रसिद्ध होत राहतील असं म्हटल्यामुळे मुस्लीम जगत आणि फ्रान्स यांच्यात वाद सुरू झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : फ्रान्समधील इतिहासाचे प्राध्यापक सॅम्युएल पॅटी हे शाळेतून घरी परतताना पॅरिसच्या उपनगरात त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला. पॅटी यांनी मुलांना मोहम्मद पैगंबरांची कार्टून्स दाखवल्यामुळे त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी हल्लेखोराला बंदुकीची गोळी घालून ठार मारले. त्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी या हत्येला इस्लामी दहशतवाद असं संबोधलं आणि ते म्हणाले, ‘इस्लाम आमच्या भविष्यावर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे जे कधीच होणार नाही. पैगंबरांची कार्टून प्रसिद्ध होतच राहतील.’ या घटनांमुळे आणि मॅक्रॉन यांनी पैगंबरांची कार्टून प्रसिद्ध होत राहतील असं म्हटल्यामुळे मुस्लीम जगत आणि फ्रान्स यांच्यात वाद सुरू झाला आहे.

मुस्लिमांचं ‘बॉयकॉट फ्रान्स’

पैगंबरांचं कार्टून काढण्याला मुस्लीम ईशनिंदा मानतात. त्यामुळे त्यांनी ‘बॉयकॉट फ्रान्स’ ची घोषणा करून फ्रेंच उत्पादनांचा बहिष्कार सुरू केला आहे. हे काही कट्टर मुस्लिमांचं कारस्थान आहे, असं म्हणत फ्रान्सने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण हे प्रकरण गंभीर होत चाललं आहे. केवळ सोशल मीडियातच नाही तर मुस्लीम देशांनी अधिकृतपणे पत्रकं काढून फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं आहे.

कुवेतमधल्या खासगी सहकारी संघटनेने 23 ऑक्टोबरला फ्रान्सवर बहिष्कार टाकण्याचं पत्रक काढलं आणि त्यांच्या सदस्य असलेल्या 60 संस्थांनी फ्रेंच उत्पादनं विकणं बंद केलं. दोहामध्येही काही घटना घडल्या असून, कतार विद्यापीठाने फ्रान्सची भूमिका इस्लामविरोधी असल्याचं सांगत फ्रेंच सांस्कृतिक आठवड्याचा कार्यक्रम रद्द केला.

मुस्लीम देशांत फ्रान्स आणि मायक्रोंविरुद्ध निदर्शनं होत आहेत. कुठे-कुठे काय पडसाद उमटत आहेत?

'मॅक्रॉन यांनी डोकं तपासून घ्यावं'

तुर्कीचे अध्यक्ष अर्दोआन यांनी म्हटलंय ' ज्या देशात लाखो मुस्लीम राहतात त्या देशाच्या प्रमुखाला जर लोकांच्या श्रद्धेच्या स्वातंत्र्याबद्दलचीच समज नसेल तर काय करणार? त्यांनी डोक्याचा इलाज करून घ्यावा.'

'अभिव्यक्तिच्या नावाने ईशनिंदा?'

फ्रान्समधील शिक्षकाच्या हत्येबद्दल कुवेतच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केलं पण त्याचं राजकारण करून धर्मद्वेष पसरवणं योग्य नाही असं ते म्हणाले. सौदी अरबमध्ये असलेल्या 57 इस्लामिक देशांच्या संघटनेने पैगंबरांच्या कार्टूनबद्दल शिकवण्यावर टीका केली असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही एखाद्या धर्माची किंवा देवाची निंदा करू शकत नाही असं म्हटलं आहे.

'ध्रुवीकरणाचं राजकारण नको'

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मॅक्रॉन यांनी या वेळी राजकीय ध्रुवीकरण करून कट्टरतेला चालना द्यायला नको होती. इस्लामोफोबिया पसरवण्यावर विश्वास ठेवणारे हे लोक आहेत. मोरक्को आणि जॉर्डननेही पैगंबरांच्या कार्टून प्रकाशनावर आक्षेप घेतला.

फ्रान्सनी कसं केलं डॅमेज कंट्रोल?

मुस्लीम देशांनी संघटितपणे फ्रान्सवर बहिष्कार टाकल्यावर फ्रान्सला जाग आली. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा बहिष्कार उठवला जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दुसरीकडे मायक्रोंनेही ट्विटरवरून म्हटलं की, ‘ते प्रक्षोभक भाषणांना पाठिंबा देत नाहीत. माणूसकीचा सन्मान आणि जागतिक मूल्यांना ते पाठिंबा देतात.’त्याचबरोबर त्यांनी सर्व संप्रदायांना शांतता राखण्याचं आवाहनही केलं.

फ्रान्सची भूमिका समजणं गरजेचं

हत्येची घटना आणि मायक्रो यांनी कार्टून प्रकाशनाला दिलेला पाठिंबा यामुळेच हे प्रकरण इतकं वाढलं आणि लगेच सगळ्या मुस्लीम देशांनी त्याला पाठिंबा दिला इतकंच कारण नाही. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ज्या फ्रान्समध्ये 60 लाख मुस्लीम राहतात तिथं हा वाद पेटण्यामागे आणखीही अनेक कारणं आहेत.

- 1905 मध्ये सर्वधर्म समभावाचा विचार स्वीकारलेल्या फ्रान्सने गेल्या काही दिवसांपासून इस्लामबद्दल भेदभावाची भूमिका घेतली आहे. फ्रान्समधल्या मुस्लिमांना 'काउंटर सोसायटी' म्हटलं जातं आणि 2004 मध्ये युरोपातल्या फ्रान्सनेच हिजाबवर बंदी घातली होती.

- इस्लाममध्ये सुधारणा करण्याबद्दल मॅक्रॉन यांनी आधी एक वक्तव्य केलं आहे ज्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. फ्रान्समधील अल्पसंख्य मुस्लिमांवर 2012 पासून जवळजवळ 36 हल्ले झाले आहेत या गोष्टीलाही महत्त्व आहे.

- 2022 मध्ये फ्रान्समध्ये होणाऱ्या निवडणुकीची तयारी म्हणून मॅक्रॉन इस्लामविरोधी भूमिका घेत असल्याचंही म्हटलं जात आहे. मॅक्रॉन असा कायदा करण्याच्या तयारीत आहेत जेणेकरून परदेशी निधीमुळे प्रशिक्षित इमाम फ्रान्समध्ये येऊच शकणार नाहीत. मशिदींना देशाकडून निधी मिळावा आणि करसवलतीही मिळाव्यात असाही एक प्रस्ताव आहे.

- मॅक्रॉन यांनी स्वत: इस्लाम संकटात असल्याचंही वक्तव्य केलं आहे. त्यांच्या मंत्र्यांनीही इस्लामी विघटनवाद आणि इस्लामला केंद्रस्थानी ठेऊन फ्रान्ससमोर सिव्हिल वॉरचं संकट असल्याचंही म्हटलं आहे.

एकूणात फ्रान्सवर फॅसिस्ट भूमिका, राजकीय फायद्यासाठी आंतरराष्ट्रीय मूल्यांची पायमल्ली करणं असे अरोप होत आहेत. दुसरीकडे फ्रान्स आपली सर्वधर्मभावाची प्रतिमा वाचवण्यासाठी आणि व्यावसायिक तोटा टाळण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 28, 2020, 12:24 AM IST
Tags: imran khan

ताज्या बातम्या