नवी दिल्ली, 5 जानेवारी : ‘मी हातमोजे घालते आणि नदीपात्रात पडलेले अर्धवट कुजलेले प्राण्यांचे मृतदेह बाहेर काढते. त्यापैकी सॉलिड वेस्ट जाळून टाकते किंवा एखाद्या लांबवरच्या कचरा डेपोत टाकते. एखाद्या मानवी अर्भकाचा मृतदेहही मला सापडतो तो मी नदीपात्रातच खड्डा करून त्यात गाडते. हे सगळं करताना कुजलेल्या वासामुळे श्वासही गुदमरतो पण मी हे आव्हान एक मिशन म्हणून हे काम स्वीकारलं असून ते करतच राहणार,’ हे बोल आसाममधील पर्यावरणवादी कार्यकर्ती मुन्नी छेत्री (Munni Chetri) हिचे आहेत .
आसाममधील बदरापूरमधील बाघा बाजारमध्ये राहणारी मुन्नी ही 26 वर्षांची तरुणी, बराक खोऱ्यातील (Assam's Barak Valley) नद्यांची पात्रं स्वच्छ करण्याचं काम एकटी करत असते. सुरुवातीच्या काळात एक शिक्षक आणि काही शेजारी तिच्यासोबत स्वच्छतेसाठी आले पण एका दिवसाच्या कामानंतर त्यांचा उत्साह मावळला. त्यानंतर मात्र मुन्नी सतत एकटी दिवसातले 6 तास हे स्वच्छतेचं काम करत आहे.
पैशाची अडचण असल्यामुळे कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडावं लागल्यानंतर सहा जणांच्या कुटुंबाला पोसण्यासाठी मुन्नीनी काही दिवस शिकवण्या घेतल्या. त्यानंतर मात्र तिने झोकून देऊन हे काम स्वीकारलं आहे. तरीही विज्ञान शाखेतून शिकणाऱ्या तिच्या लहान बहिणीच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये याची काळजी मात्र ती घेते.
ती म्हणाली, ‘माझे मित्र-मैत्रिणी मला वेडी समजतात काहींनी तर मला डॉक्टरांकडून तपासून घेण्याचा सल्लाही दिला आहे. बराक खोऱ्यातील स्वच्छतेसाठी सरकारने एक अभियान सुरू केलं असून त्याला मुबलक पैसेही दिले आहेत तर तू कशाला त्याची चिंता करतेस असंही ते म्हणतात.’
'स्वच्छ बराक, स्वस्थ बराक' ही मुन्नीसाठी केवळ घोषणा नाही, तर तिला कार्य करण्याची उमेद देणारी शक्ती आहे. ती पहाटे 6 ला घरातून निघते आणि बराक खोऱ्यातल्या मुख्य नद्यांची पात्रं स्वच्छ करते. ती म्हणाली, ‘मी बराक आणि कुशियारा (Kushiyara) नदीपात्रांतील कचरा गोळा करते. नदीचं पाणी आणि पात्र दोन्हीही तितकंच प्रदूषित आहे. बेबी डायपर्स, प्राण्यांचे मृतदेह आणि अनेकदा मानवी अर्भकांचे मृतदेहही या पात्रांमध्ये सापडतात. एक मुलगी असून तू हे असलं काम कसं करू शकतेस? असंही अनेक जण मला विचारतात. पण स्वच्छ परिसरात राहणं हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करायला हवेत. केवळ सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही.’
बराक नदी मणिपूर, नागालँड, मिझोराम आणि आसाम या राज्यांतून 900 किलोमीटर प्रवास करते आणि नंतर बांगलादेशात प्रवेश करते. 2016 मध्ये लखिमपूर आणि भांगादरम्यानचा नदीचा प्रवाह राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 6 म्हणून घोषित करण्यात आला असून या भागात माणसाला जाणं शक्य आहे. कुशियारा ही नदी बांगलादेश आणि आसामातून वाहते.
गेल्या तीन महिन्यांत तिने नदीपात्रांतून 10 ते 12 टन प्रदूषकं आणि कचरा गोळा केल्याचं ती सांगते. ‘मी जेव्हा माझ्या कामाचे फोटो सोशल मीडियात टाकते तेव्हा लोक फक्त लाइक करतात पण प्रत्यक्ष स्वच्छतेला यायला कुणीही तयार नसतं,’ अशी खंतही मुन्नीने व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.