Pulwama Attack नंतर भारत वापरणार का इस्त्रायलचा 'मोसाद पॅटर्न'

दाऊद, अझहर मसुद, हाफीज सईद सारखे अनेक कट्टर अतिरेकी मोकाट फिरत आहेत. या सर्वांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी भारत 'मोसाद पॅटर्न' वापरणार का असा प्रश्न विचारला जातोय.

News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2019 08:15 PM IST

Pulwama Attack नंतर भारत वापरणार का इस्त्रायलचा 'मोसाद पॅटर्न'

मुंबई 15 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर सर्व देशात आक्रोश निर्माण झालाय. सहन तरी किती करायचं असा लोकांचा प्रश्न आहे. 90 च्या दशकातले मुंबईतले बॉम्बस्फोट, संसदेवरचा दहशतवादी हल्ला, 26/11 चा मुंबईवरचा भीषण हल्ला, कारगील, पठाणकोट, उरी आणि आता पुलवामा...यामुळेच लोक म्हणतात आता सहन तरी किती करायचं? एकदाचा पाकिस्तानला धडा शिकवा अशी वारंवार मागणीही होतेय. पण धडा म्हणजे नेमकं काय करायचं? यावर नेहमी इस्रायलचं उदाहरण दिलं जातं. इस्रायल विरुद्ध वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी धडा शिकवला. ही कारवाई केली इस्त्रायलच्या 'मोसाद' या गुप्तचर संस्थेने. त्यामुळेच भारत हा 'मोसाद' पॅटर्न वापरणार का? असा प्रश्न आता विचारला जातोय.


मोसाद

'मोसाद' ही इस्त्रायलची गुप्तचर संस्था. या छोट्याश्या देशाची लोकसंख्या काही लाखांच्या घरांमध्ये. शेजारची सर्व राष्ट्र जीवावर टपलेली. त्यातल्या पॅलेस्टाईनसोबत जन्मापासूनच वैर. अरबांनी केलेलं आक्रमण. यात इस्रायलने अरबांचा पराभव केला. चारही बाजूंनी शत्रू राष्ट्रांनी घेरलं गेलेलं असतानाही सर्व जगावर इस्त्रायलने आपला धाक आणि दहशत निर्माण केली.


Loading...

यात सगळ्यात अग्रेसर होती ती 'मोसाद' ही संघटना. जगातली सर्वात धोकादायक आणि पाताळयंत्री अशी 'मोसाद'ची ओळख आहे.   'मोसाद'ने इस्त्रायलविरुद्ध कारवाई करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याला वेचून ठार केलं. यातली सर्वात थरारक कारवाई होती ती म्युनिच ऑलेम्पिकमधल्या घटनेचा बदला घेण्याची. 'मोसाद'च्या या कारवाईने सर्व जग हादरुन गेलं होतं.


काय झालं 'म्युनिच'मध्ये?

5 सप्टेंबर 1972. जर्मनितलं महत्त्वाचं शहर असलेल्या म्युनिच मध्ये ऑलिम्पिकच्या स्पर्धा होत्या. या स्पर्धेत इस्त्रायलच्या 11 खेळाडुंचं पथक सहभागी झालं होतं. जगभरातले खेळाडू सहभागी झाल्याने तिथे सुरक्षाव्यवस्थाही कडक होती. पण ही पोलादी सुरक्षा व्यवस्था भेदून 8 अनोळखी माणसं खेळाडू राहत असलेल्या नगरात आली.


सर्वांना बाजूला सारत ते आठही जण इस्त्रायलचे खेळाडू राहात असलेल्या इमारतीमध्ये घुसले. ही आठही माणसं अतिरेकी होती. पॅलेस्टाईनच्या पीएलओ या दहशतवादी संघटनेची ती सदस्य होती. त्यांनी इस्त्रायलच्या सर्व 11ही खेळाडूंना ओलीस ठेवलं. शस्त्रसज्ज असलेल्या या अतिरेक्यांच्या कृतीनं सर्व जग हादरुन गेलं. धाक निर्माण व्हावा म्हणून त्यांनी दोन इस्त्रायली खेळाडूंची हत्याही केली.


इस्त्रायलच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टाईनच्या सर्व 234 खेळाडूंची सुटका करावी अशी त्यांची मागणी होती. मात्र इस्त्रायलच्या तत्कालीन पंतप्रधान गोल्डा मायर यांनी ती मागणी मान्य केली नाही. शेवटी इस्त्रायल आणि जर्मनीने योजना आखून त्या अतिरेक्यांना आणि ओलीस ठेवलेल्या खेळाडूंना सुरक्षीत देशाबाहेर जाऊ देतो असं सांगून विमानतळावर आणलं. विमानतळावर झालेल्या चकमकीत सर्व अतिरेकी आणि खेळाडूही मारले गेले.


ऑपरेशन 'रॅथ ऑफ गॉड'


या घटनेचा बदला घेण्याचं काम इस्त्रायलने 'मोसाद'ला दिलं. दहशतवाद्यांची ही योजना आखण्यात ज्या ज्या लोकांनी भूमिका निभावली त्या सर्व लोकांची यादी करून 'मोसाद'ने खास योजना तयार केली. त्याला नाव दिलं 'रॅथ ऑफ गॉड' म्हणजेच 'देवाचा प्रकोप'. इस्त्रायल काय करू शकतो याची कल्पना असल्याने अतिरेकी हल्ला आखणारे दहशतवादी जगभर विखूरले  गेले.


'मोसाद'ने जगभर आपले खास एजंट्स तयार केले. कारवाई करताना 'मोसाद'चं नाव उघड होणार नाही आणि ते एजंट्स पकडले गेले तर 'मोसाद' त्यांच्याशी आपला संबंध दाखवणार नाही असंही पक्क केलं गेलं. त्यानंतर 'मोसाद'च्या त्या एजंट्नी जे केलं ते सर्व जगाला हादरवणारं होतं.


अतिरेक्यांच्या त्या सर्व म्होरक्यांना हुडकून काढून 'मोसाद'ने त्यांना ठार केलं. त्यासाठी साम-दाम-दंड नीतीचा वापर केला. विषप्रयोग केले, शॉर्प शुटर्स नेमले, कुणाला प्रेमात अडकवलं तर कुणाचं घरच उडवून दिलं, बॉम्ब स्फोट केले असं करत सर्व पॅलिस्टीनी अतिरेक्यांना 'मोसाद'ने ठार केलं.


20 वर्ष चाललं ऑपरेशन


28 जून 1973 ला सुरू झालेलं 'मोसाद'चं हे ऑपरेशन तब्बल 20 वर्षानंतर संपलं. या काळात 'मोसाद'ने एकूण 30 अतिरेकी आणि त्यांच्या नेत्यांना ठार केलं. यासाठी त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी म्युनिच प्रकरणाचा बदला घेतला आणि नंतरच मोकळा श्वास घेतला. अशी अनेक ऑपरेशन्स करून इस्त्रायलने आपल्याविरुद्ध दहशतवाद  करणाऱ्या संघटनांचा बदला घेतला आहे.


इस्त्रायल सारखा देश जर अशी भूमिका घेऊ शकतो तर मग भारत का नाही असा प्रश्न आता विचारला जात आहे. मुंबई साखळी बॉम्बस्फोट करुन दाऊद इब्राहिम अजुनही पाकिस्तानात सुरक्षीत आहे. भारत विरोधी कारवाया करणारे अझहर मसुद, हाफीज सईद सारखे अनेक कट्टर अतिरेकी मोकाट फिरत आहेत. या सर्वांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा होणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

VIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहिदांबद्दल सांगताना News18India च्या अँकरला अश्रू अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2019 08:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...