नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) सत्ता प्रस्थापित केल्यानंतर भारतात त्यावरून उलटसुलट चर्चेचा उधाण चढलं आहे. प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा (Munavvar Rana) यांनी अफगाणिस्तानपेक्षा अधिक क्रूरता भारतात असल्याचं म्हटलं आहे. ‘पहले रामराज था, अब कामराज है’, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारला टोमणा लगावला आहे. प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी तालिबानची भूमिका समजून घेण्याची गरज आहे, असं सांगत तालिबानवर विश्वास (Trust) ठेवायला हरकत नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे तालिबानच्या टीकाकारांनी राणा यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
काय म्हणाले मुनव्वर राणा?
तालिबानी हे वाईट लोक नसून त्यांच्यावर झालेल्या 20 वर्षांच्या अन्यायाचा हा परिणाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जी अन्यायाची बीजं 20 वर्षं रोवली गेली, त्यातून गोड फळं कशी मिळतील, असा सवाल त्यांनी केला आहे. क्रियेला मिळालेली ती प्रतिक्रिया असून तालिबानवर विश्वास ठेवायला भारताला हरकत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
केली वाल्मिकी ऋषींशी तुलना
रामायणात वाल्मिकी ऋषींचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. वाल्याचा वाल्मिकी झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत तालिबानचंही तसंच होईल, असा दावा मुनव्वर राणा यांनी केला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांचे पूर्वावर घनिष्ट संबंध असून पुढेही हे संबंध चांगलेच राहतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
खरा धोका पाकिस्तानपासून
अफगाणिस्तान किंवा तालिबानला काश्मीरमध्ये काहीही रस नसून आपल्याला खरा धोका हा पाकिस्तानपासूनच असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तालिबानचे भारताशी काहीही शत्रुत्व असण्याचे कारण नसून त्यांनादेखील भारतासोबत चांगले संबंध ठेवण्यातच रस असू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
हे वाचा -तालिबानचा भारताला मोठा धक्का, घेतला हा मोठा निर्णय
महिलांवर सौदी अरेबियातही अत्याचार
महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या मुद्द्यावर शायर राणा यांनी आपली भूमिका मांडली आहे. महिलांवर सौदी अरेबियातही अत्याचार होत असल्याचं सांगत त्यांनी पूर्ण परिसराचा आणि काळाचा विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. भारताने जर अफगाणिस्तानच्या प्रगतीसाठी यापूर्वी पावलं उचलली असतील, तर त्याचा तालिबान्यांकडून आदरच केला जाईल, असंही राणा यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Taliban