• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • 'बेळगाव सोडा, मुंबई पण कर्नाटकचा भाग', बिथरलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी उधळली मुक्ताफळे

'बेळगाव सोडा, मुंबई पण कर्नाटकचा भाग', बिथरलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी उधळली मुक्ताफळे

'मुंबई प्रदेश हा केंद्रशासित करा, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत,' असंही उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी म्हटलं आहे.

  • Share this:
बंगळुरू, 27 जानेवारी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील उच्चाधिकारी समितीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अथितीगृह येथे होताच कर्नाटकमध्ये थयथयाट सुरू झाला आहे. 'बेळगाव सोडा, मुंबई पण कर्नाटकचा भाग होता, मुंबईवर पण आमचा हक्क आहे,' अशी मुक्ताफळे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी उथळली आहेत. 'मुंबई प्रदेश हा केंद्रशासित करा, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत,' असंही उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सवदी यांच्या वक्तव्याने सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे. मुंबईमधील सीमाप्रश्नाच्या बैठकीनंतर कन्नडीगांचा थयथयाट सुरू झाला असून कन्नड संघटनांनी आज प्रकाशित झालेलं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाच्या प्रतीकात्मक प्रती जाळल्या आहेत. बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या आणि अन्य संघटनांनी आंदोलन केलं. केंद्र सरकारने पुस्तक प्रकाशित करू देऊ नये, अशी मागणीही या संघटनांनी केली आहे. तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. मराठी बांधवांसाठी महाराष्ट्राचा एल्गार, मुख्यमंत्र्यांनी घेतली आक्रमक भूमिका कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्वपक्षीयांनी एकजुटीने आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना, कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले आहेत, ते थांबवावे लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बैठकीत म्हटलं आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात यावा. त्यासाठी समन्वयक मंत्री आणि सीमा प्रश्न कक्ष यांनी वकील आणि विविध घटकांचा समन्वय करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. हेही वाचा - कर्नाटक व्याप्त भूभाग ताबडतोब केंद्रशासित जाहीर करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सीमा भागाचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महाधिवक्ता अ‍ॅड.आशुतोष कुंभकोणी, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विधी विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड आदी उपस्थित होते.
Published by:Akshay Shitole
First published: