नवी दिल्ली 19 मे : पैशासाठी कोण कुठली शक्कल लढवेल याचा काहीच अंदाज नसतो. पैसे मिळवून विलासी जीवन जगण्यासाठी एका तरुणीने मुंबईतल्या एका बड्या कंपनीच्या सीईओला हनीट्रॅपमध्ये ओढलं आणि त्याचं अपहरण केलं. नवी दिल्लीत ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावून त्या तरुणीला अटक केलीय.
सुरेंद्र कुमार हे 64 वर्षांचे गृहस्थ मुंबईत एका कंपनीत सीईओ आहेत. फेसबुकवर त्यांची एका तरुणीशी ओळख झाली. ती तरुणी दिल्लीची राहणारी होती. कुमार हे कंपनीच्या कामानिमित्त कायम दिल्लीत जात असत. अशाच एका भेटीत त्यांची त्या तरुणीशी भेट झाली. नंतर त्या तरुणीने त्यांना आपल्या जाळ्यात ओढलं. कुमार हेही त्या तरुणीवर विश्वास ठेऊन तीच्या प्रभावाखाली आले होते.
काही दिवसांपूर्वी कुमार हे दिल्लीला गेले होते. काही दिवसानंतर त्यांचा संपर्क तुटल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. पोलिसांनी जेव्हा सर्व माहिती घेतली तेव्हा त्यांना प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा कुमार हे दोन तरुणींसोबत गेलेले दिसत होतं.
त्यानंतर कुमार यांच्या एका सहकाऱ्याला खंडणीसाठी फोनही आला होता. 30 लाखांची रक्कम जमविण्यास त्यांनी सांगितलं होतं. पोलिसांनी सापळा रचत कुमार यांच्या सहकाऱ्याला दिल्लीत एका ठिकाणी जाण्यास सांगितलं. नंतर कुठून फोन येतो त्याचं लोकेशनही तपासलं. पैसे नेण्यासाठी जेव्हा आरोपी आले तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली आणि सगळा उलगडा झाला.
त्या तरुणींची एक टोळी असून त्या अशाच प्रकारे लोकांना आपल्या जाळ्यात ओढून लुटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तपासानंतर अशी अनेक प्रकरणं बाहेर येतील असा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला.