इंदूर, 03 ऑगस्ट: मध्य प्रदेश हाय कोर्टाच्या इंदूर खंडपीठाने विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर करण्यासाठी एक अजब अट ठेवली आहे. कोर्टाने म्हटलं आहे की, ज्या महिलेची छेड काढली तिच्या घरी जाऊन राखी बांधून घ्यावी. महिलेच्या मुलांना भेटवस्तू द्याव्यात तर जामीन मंजूर केला जाईल. या अजब अटीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आज बहिण-भावाचं प्रेम दाखवणारा आणि बहिणीच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या भावासाठी बहिण राखी बांधते. आज देशभर रक्षाबंधनचा सण साजरा केला जात आहे. मात्र मध्य प्रदेश हायकोर्टानं विनयभंग केलेल्या तरुणाला दिलेली शिक्षा चर्चेचा विषय ठरली आहे.
एप्रिलमध्ये विक्रम बागरी नावाच्या व्यक्तीविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बागरी यांनी एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा आरोप होता. याप्रकरणी बागरी यांनी जामीन अर्ज दाखल केला, त्यावर कोर्टाने सुनावणी देत हा आदेश दिला. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आरोपी आपल्या पत्नीसमवेत राखी बांधून घेण्यासाठी पीडितेच्या घरी जाणार आहे.
वाचा-रोहित पवारांचं अनोख रक्षाबंधन, जगाला वाचवणाऱ्या बहिणीचा घेतला आशीर्वाद
न्यायालयाने घातलेल्या अटीनुसार, आरोपीला पीडित महिलेची समजूत घालून त्याला भाऊ म्हणून स्वीकारण्याची विनंती करायची आहे. तसेच, या महिलेचे आयुष्यभर संरक्षण देण्याची प्रतिज्ञा करावी लागणार आहे. त्यानंतर राखी बांधल्यानंतर महिलेला 11 हजार रुपये आणि मिठाईही द्यायची आहे.
वाचा-राशीभविष्य: कुंभ आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आहे खास
याचबरोबर न्यायालयाने ही अट पूर्ण झाल्यानंतर या अनोख्या रक्षाबंधनाचे फोटो आणि पीडित महिलेला पैसे दिल्याची पावती कोर्टात सादर करावी लागेल, असेही कोर्टाने म्हटले आहे. यापूर्वी इंदूर खंडपीठाने बेकायदेशीर दारू विक्री केल्याप्रकरणी अटक केलेल्या दोन जणांना जामिनासाठी सॅनिटायझर आणि मास्क दान करण्याची अट देखील ठेवली होती.