Home /News /national /

आई नव्हती, वडिलांचं कोरोनामुळे निधन; पण हरले नाहीत, मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी तिघींचा संघर्ष

आई नव्हती, वडिलांचं कोरोनामुळे निधन; पण हरले नाहीत, मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी तिघींचा संघर्ष

कोरोनारूपी काळानं या मुलींच्या कुटुंबावर घाला घालता. या बहिणींना आई नाही. त्यातच वडील कोरोनामुळं मृत्युमुखी पडले. त्यामुळे या मुलींवर मोठं संकट कोसळलं.

    भोपाळ, 14 जून : गेल्या दोन वर्षांपासून देशभरात कोरोनाचा (Corona) कहर सुरू आहे. काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानं कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत; पण त्यापूर्वी कोरोनामुळे देशभरात बिकट स्थिती निर्माण झाली होती. कोरोना आणि लॉकडाउनमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कोरोनामुळे कर्त्या माणसांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबं उघडी पडली. मुलं अनाथ झाली. अनेकांची आर्थिक स्थिती (Financial Position) नाजूक बनली. भोपाळमधल्या (Bhopal) सहा बहिणींची गोष्ट अशीच काहीशी आहे. कोरोनारूपी काळानं या मुलींच्या कुटुंबावर घाला घालता. या बहिणींना आई नाही. त्यातच वडील कोरोनामुळं मृत्युमुखी पडले. त्यामुळे या मुलींवर मोठं संकट कोसळलं; पण सहापैकी चौथ्या क्रमांकाच्या बहिणीनं कुटुंबाला आधार दिला आहे. तिनं मोठ्या बहिणीचं लग्न करून दिलं असून, लहान बहिणींचा ती मोठ्या कष्टानं सांभाळ करत आहे. `दैनिक भास्कर`नं याविषयीचं वृत्त दिलं आहे. भोपाळमधल्या सहा बहिणींचा आधार कोरोनानं हिरावून घेतला. वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं. वडिलांनी दोन बहिणींचा विवाह करून दिला होता; पण चार अविवाहित बहिणी अनाथ (Orphan) झाल्या. कुटुंब कसं चालवावं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. वडिलांच्या उपचारांसाठी आणि दुकानासाठी घेतलेलं कर्ज (Loan) फेडायचं आव्हान होतं; पण यासर्व समस्यांवर मात करण्याचा निर्णय रेश्मानं म्हणजेच चौथ्या क्रमांकाच्या मुलीनं घेतला. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना सरकारकडून मदत मिळते असं समजल्यावर या बहिणींनी वडिलांच्या निधनानंतर मदतीसाठी महापालिकेत अर्ज केला; मात्र मदतीसाठी अनेकदा चकरा माराव्या लागला. त्यानंतर 5-6 महिन्यांनी 20 हजार रुपयांची मदत मिळाली; मात्र मुख्यमंत्री कोविड चाइल्ड केअर योजनेतून कोणताही लाभ मिळाला नाही. `तुमच्या वडिलांचा मृत्यू जानेवारीत झाला आहे. ज्या मुलांच्या आई-वडिलांचा कोरोनामुळे मार्च ते जून 2021 या कालावधीत मृत्यू झाला आहे, त्यांच्यासाठी ही योजना होती,` असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. महिला बालकल्याण विभागाकडून अधिकाऱ्यांना अशा कुटुंबांची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी या बहिणींकडून वडिलांच्या कोरोनावरच्या उपचारांची कागदपत्रं मिळवली आणि या वर्षापासून स्पॉन्सर योजनेतून दोन हजार रुपये प्रति महिना पेन्शन (Pension) सुरू केलं. भोपाळ जिल्हा कार्यक्रम अधिकारी योगेंद्र सिंह यादव यांनी सांगितलं, `वडिलांच्या निधनामुळं हे कुटुंब अडचणीत सापडलं आहे. कोविडमुळे वडिलांचं निधन झाल्यानं त्यांना 50 हजार रुपये देण्यात आले आहेत. दोन अल्पवयीन बहिणींना चार हजार रुपये प्रति महिना पेन्शन देण्यात येणार आहे. त्यांना शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे. आरोग्यविम्यासोबतच दोन्ही मुलींचं वय 23 वर्षं पूर्ण झाल्यावर त्यांच्या खात्यात एकरकमी निधी जमा होईल.` तत्पूर्वी, या बहिणींचा जगण्याचा संघर्ष सुरू झाला होता. रेश्मानं वडिलांचं बंद असलेलं किराणा दुकान पुन्हा सुरू केलं. मोठी बहीण रज्जोला आधार दिला आणि आयेशा, मुन्नी (सर्व नावं काल्पनिक) या लहान बहिणींना आपल्या मुलींप्रमाणे ती सांभाळू लागली. वडिलांच्या उपचारांसाठी घेतलेलं कर्ज फेडण्याचं आणखी एक आव्हान तिच्यासमोर होतं. अनेक अडचणी असताना मोठी बहीण रज्जोचा विवाह करण्याचा निर्णय तिनं घेतला. `रज्जोच्या लग्नासाठी काही पैसे जमा केले. ओळखीच्यांकडून सामान उधार घेतलं आणि सर्व बहिणींनी मिळून रज्जोचं लग्न लावून दिलं. यासाठी दुसऱ्या क्रमांकाच्या बहिणीच्या पतीनं भावाप्रमाणे मदत केली. तिसऱ्या क्रमांकाच्या बहिणीचं लग्न ठरलेल्या घरच्यांनीही कोणतीही मागणी केली नाही. तसंच लग्न साधेपणानं करून देण्यास सांगितलं,` असं रेश्मा म्हणाली. रेश्मानं सांगितलं, `आमच्या वडिलांनी दोन ते तीन वर्षांपूर्वी दुकान सुरू करण्यासाठी त्यांच्या नावावर एका छोट्या बॅंकेतून कर्ज घेतलं होतं. वडिलांच्या निधनानंतर कर्जपुरवठादारांनी वारंवार नोटीस देण्याचा आणि पैसे मागण्याचा धडाका लावला. आता माझ्यासमोर हे कर्ज फेडण्याचं, तसंच वडिलांच्या उपचारासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी उधार घेतलेले पैसे फेडण्याचं आव्हान आहे. दोन लहान बहिणींचं शिक्षण (Education) आणि त्याचं लग्न करून देण्याची मोठी जबाबदारीदेखील माझ्यावर आहे. जोपर्यंत या दोन बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहत नाहीत, त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी माझा विचार करू शकत नाही. या बहिणींसाठी मी आई-वडील आणि मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडणार आहे.`

    First published:

    Tags: Corona, Finance, Madhya pradesh

    पुढील बातम्या