सीधी, 1 डिसेंबर : असं म्हणतात कठीण काळात आईच (Mother Love) आपल्यासाठी धावून येते. वेळ आली तर ती आपल्या मुलासाठी कोणतंही आव्हान स्वीकारायला तयार असते. आईच्या या प्रेमाला सलाम करावा अशी एक घटना मध्य प्रदेशातीस सीधी जिल्ह्यातून समोर आली आहे. येथे एका आईने आपल्या 6 वर्षांच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी एकटीने बिबट्याशी (leopard Attack) दोन हात केले आणि मुलाला सुखरूप सोडवून आणलं.
चिमुरड्याला जबड्यात अडकवून घेऊन गेला बिबट्या..
ही घटना सीधी जिल्ह्यातील कुसमी ब्लॉक येथील बाडीझरिया गावातील आहे. हे गाव जंगल आणि डोंगरांनी व्यापलेलं आहे. दोन दिवसांपीर्वी येथे रविवारी सायंकाळी किरण बैगा आपल्या मुलासोबत घरी आली. ती चूल पेटवत होती. त्या दरम्यान मागून एक बिबट्या आला आणि शेजारी बसलेल्या 6 वर्षांच्या चिमुरड्याला जबड्यात अडकवून घेऊन गेला.
हे ही वाचा-Shocking video! Hair style च्या नादात जीवाशी खेळ; पठ्ठ्याने चक्क केसच पेटवले
बिबट्याला दिलं आव्हान..
बिबट्या जसा चिमुरड्याला घेऊन पळाला, त्यानंतर महिला किरणदेखील त्याच्या मागे मागे धावली. तब्बल एक किलोमीटरपर्यंत तिने बिबट्याचा पाठलाग केला. मात्र बिबट्या कुठेही दिसत नव्हता. त्यानंतर तिने पाहिलं की, झाडांमध्ये बिबट्या बाळाला आपल्या जबड्यात पकडून बसला होता. महिला रागाने काठी घेऊन बिबट्याच्या दिशेने धावली. बराच वेळ ती त्याला मारत होती. दुसरीकडे बिबट्या तिच्यावर गुरगुरत होता. मात्र तीदेखील त्याच्या अंगावर धावून जात होती. शेवटी कसंबसं त्याने पंज्यातून बाळाला सोडलं. बिबट्या तिच्यावर हल्ला करणार तेवढ्यात गावकरी तेथे दाखल झाले. महिलेने बाळाला कवटाळलं. यानंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने निघून गेला.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही केलं कौतुक
या घटनेनंतर गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. सूचना मिळताच तेदेखील येथे दाखल झाले. जखमी मुलगा आणि त्याच्या आईला तत्काळ रुग्णालयात दाखळ करण्यात आलं. बिबट्याच्या हल्ल्यात बाळाच्या पाठीवर व एका डोळ्याला गंभीर जखम झाली आहे. त्याशिवाय किरणच्याही शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. महिलेच्या धाडसाचं गावकऱ्यांसह वन अधिकाऱ्यांनीही कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.