नवी दिल्ली, 13 मार्च : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा देशाच्या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रियांका गांधींची मंगळवारी (12 मार्च) पहिल्यांदाच गुजरातमधील गांधीनगर येथे जाहीर सभा झाली. त्यांची पहिलीच सभा असल्यानं त्या नेमकं काय बोलणार? या पार्श्वभूमीवर सर्वांचंच लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागलं होतं. जनसभेला संबोधित करताना प्रियांका गांधींनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. सभा झाल्यानंतर त्यांनी ट्विटरवरदेखील पहिली पोस्ट शेअर केली. प्रियांका गांधी यांनी महिन्याभरापूर्वी ट्विटर अकाउंट सुरू केलं. यानंतर मंगळवारी (12 मार्च)रात्री पहिल्यांदाच त्यानं पहिलं ट्विट पोस्ट केलं. ट्विटमध्ये त्यांनी साबरमती आश्रमामधील फोटोसहीत महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा संदेश शेअर केला आहे.
“I object to violence because when it appears to do good, the good is only temporary; the evil it does is permanent.”
दरम्यान, गुजरातमधील जाहीर सभेदरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केले.'आगामी निवडणुकीत भावनिक मुद्यांपेक्षा तुमच्यासाठी जे मुद्दे महत्त्वाचे आहेत ते समजून घ्या', असे सांगत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी नागरिकांना योग्य व्यक्तीला मतदान करण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकीत तुम्हाला गंभीरपणे विचार करावा लागेल की तुम्हाला कशाची निवड करायची आहे. तुम्ही तुमचे भविष्य निश्चित करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत फालतू मुद्यांना जागा देऊ नका, असेही त्यांनी म्हटलं.तुमची प्रगती कशी होईल, युवकांना रोजगार कसा मिळेल, महिलांची सुरक्षित वाटेल, त्यांची प्रगती होईल या मुद्दयांना महत्त्व द्या आणि विचार करुन मतदान करण्यास त्यांनी सांगितले.
जे लोक तुम्हाला मोठ मोठी आश्वासने देतात. त्यांना विचारा की दोन कोटी रोजगार देण्याच्या आश्वासनाचे काय झाले, असे सांगत प्रियांका गांधी यांनी मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
प्रियांका गांधींच्या पहिल्या भाषणाचे हे 10 मुद्दे
1 या लोकसभा निवडणुका देशासाठी महत्त्वाच्या आहेत.
2 नागरिकांची सतर्कता हेच या निवडणुकीतलं मोठं हत्यार आहे.
3 मतदान हा तुमचा अधिकार आहे. तो अधिकार नीट विचार करून बजावा.
4 आज देशात जे घडतं आहे त्याबद्दल दु:ख वाटतं.
5 भारतात जागोजागी द्वेष पसरवला जातोय, हे वाईट आहे.
6 भारताची भूमी ही महात्मा गांधींची भूमी आहे, या देशाची शिकवण काय आहे ते तुम्ही जाणून घ्या.
7 येत्या निवडणुकीत फालतू मुद्द्यांना जागा देऊ नका
8 देशातल्या लोकशाहीच्या संस्था नष्ट केल्या जातायत हे गंभीर आहे.
9 नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार होते ते कुठे गेले ?
10 या सरकारने वचन दिल्याप्रमाणे 2 कोटी रोजगार मिळाले का ?