16 मे : अंदमानात पोहोचलेला मान्सून येत्या 30 मे रोजी केरळात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून 1 जूनला केरळात पोहोचल्यानंतर पुढच्या सात दिवसात महाराष्ट्रात पोहोचतो.
यंदा हवामान विभागाने 15 मे रोजी मान्सून अंदमान-निकोबार व्दीपसमूहामध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. पण त्याच्या एकदिवस आधीच 14 मे रोजी रविवारी मान्सूनचे अंदमानात आगमन झाल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं.
गोव्यात 6 जूनपासून मान्सून दाखल होण्याची शक्याता गोवा वेधशाळेने वर्तवली आहे. तर 2 जूनपासून मान्सून पूर्व पावसावा सुरूवात होईल असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात मान्सूनचा प्राथमिक अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने यंदा मान्सून 96 टक्के होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता अल निनोचा प्रभाव कमी आहे. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यावेळी देशभरात सरासरीहून जास्त पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दुसरीकडे, पुणे शहरात या आठवड्यातही पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. जास्त करून पाऊस संध्याकाळच्या वेळी पडण्याचा अंदाज आहे. गेल्या दोन-तीन दिवसांच्या सततच्या पावसामुळे शहरात आर्द्रता 83 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे एकीकडे ऊन आणि दुसरीकडे घाम, या मुंबईकरांच्या नेहमीच्या समस्येला आता पुणेकरांनाही सामोरं जावं लागतं आहे.
दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट तीव्र झाली असून उपराजधानीने मोसमातील सर्वाधिक तापमानाचा उच्चांक नोंदवला आहे. 46.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद सोमवारी शहरात घेण्यात आली, तर ब्रम्हपुरी शहरात त्याहूनही अधिक म्हणजे 46.5 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद घेण्यात आली. रविवारपासूनच जाणवणारी उन्हाची काहिली सोमवारी अधिक तीव्र झाली होती. त्यामुळे शहरातील रस्ते ओस पडले होते.