14 मे : मान्सून ७२ तासांत अंदमानात दाखल होणाराय. मुंबईत दुसऱ्या दिवशीही पावसानं हजेरी लावली. राज्यभरात वेगवेगळ्या भागांत वळवाच्या पावसानं दोन दिवस हजेरी लावली असताना मान्सूनही अंदमानात दाखल होणाराय. दक्षिण अंदमान किनारा आणि निकोबार बेट या भागात येत्या ७२ तासांत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.
मुंबई परिसरात शुक्रवारपासून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळताहेत. आणखी दोन दिवस या सरी कोसळतील. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मान्सूनपूर्व पाऊस पडत असला तरी नागरिकांची उकाड्यापासून सुटका झालेली नाही. शनिवारी सकाळी वातावरणात काहीसा गारवा होता; मात्र दुपारनंतर पुन्हा उकाडा जाणवायला लागला.
शनिवारी कुलाबा वेधशाळेत कमाल तापमान 33.8 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 29.9 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान 34.8 अंश, तर किमान तापमान 25.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा