पुणे, 30 मे: मागील दोन दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तर मागील तीन दिवसांपासून धुव्वाधार पाऊस कोसळला आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं उस्मानाबाद परिसरात राहणाऱ्याचं बरंच नुकसान झालं आहे. घरावरील छतं उडून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. कालपासून उस्मानाबादसह पुणे आणि नांदेड जिल्ह्यातही पूर्व मोसमी पावसाने तडाखा दिला आहे. तर आजही महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी पूर्व मोसमी पावसाचे (Pre monsoon rain warnings) ढग दाटले असल्याची माहिती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
येत्या चोवीस तासांत मुंबई, पुणे, रायगड, मराठवाडा आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनचं पुणे, मुंबई आणि घाट परिसरात उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर गोवा हवामान खात्याच्या रडारमध्ये कोकण आणि सिंधुदुर्ग पट्यात पूर्वमोसमी पावसाची ढग दाटल्याची नोंद झाली आहे. याठिकाणीही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
विदर्भात गारपिटीची शक्यता
नागपूर वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात विजांच्या कडकडासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, पुणे, रायगड ढगाळ आकाश, मराठवाडा, विदर्भ पण ☁☁☁ गेल्या 24 तासात राज्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार... आजही ईशारे आहेत...IMD कडून pic.twitter.com/d5Oeb2ZhoN
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 30, 2021
हे ही वाचा-कुत्र्यांमार्फत माणसांमध्ये आलेला Canine Coronavirus व्यक्ती-व्यक्तीमध्ये पसरतो?
केरळात मान्सूनचं आगमन लांबणीवर
31 मे पर्यंत केरळमध्ये नैऋत्य मोसमी वारे दाखल होतील असा अंदाज काही दिवसांपूर्वी हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. पण दक्षिणेकडील वाऱ्याच्या स्थितीमुळे केरळात मान्सूनचं आगमन 2-3 दिवस लांबणीवर पडलं आहे. हवामान खात्याने नुकत्याच जारी केलेल्या माहितीनुसार, केरळात 3 मे पर्यंत मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे केरळमधील नागरिकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पुढील 10 -12 दिवसांत महाराष्ट्रातही मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Monsoon, Weather forecast, Weather update