कानपूर, 10 सप्टेंबर: तब्बल 70 फुट खोल विहिरीत (70 feet deep well) पडलेला मृतदेह माकडांनी शोधून (monkey found woman dead body in well) काढल्याची एक आश्चर्यचकित करणारी घटना उघडकीस आली आहे. मृत महिला काही तासांपूर्वी घरातून अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबानं गावात सर्वत्र शोधाशोध केली पण तिचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. गावातील जवळपास सर्वांच्या घरी जाऊस विचारपूस केली, तरीही संबंधित महिला नेमकी कुठे आहे? याचा कुणालाही थांगपत्ता लागत नव्हता. पण दोन माकडांनी संबंधित महिलेचा मृतदेह शोधून काढलं आहे.
विशेष म्हणजे संबंधित माकडं सकाळपासून संबंधित विहिरीच्या आसपास घुटमळत होती. काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. मध्येच किंचाळ्या मारून माणसांना विहिरीकडे पाहण्यासाठी आकर्षित करत होती. पण माकडांचा हा इशारा बराच वेळ कोणालाही लक्षात येत नव्हता. दरम्यान विहिरीत माकडाचं पिल्लू पडल्यानं माकडं असा आवाज काढत असावीत, असा गैरसमज गावकऱ्यांना झाला होता. पण गावातील एका तरुणानं संबंधित विहिरीत डोकावून पाहिलं असता, संबंधित 70 फुटांच्या कोरड्या विहिरीत बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला. यानंतर संबंधित तरुणानं याची माहिती कुटुंबाला दिली आहे.
हेही वाचा-कधी पक्षाला चोरी करताना पाहिलंय का? चोरीचा हा VIDEO पाहून लावाल डोक्याला हात
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान 70 फुट खोल विहिरीत पडलेल्या संबंधित महिलेला बाहेर काढण्यासाठी बरीच उठाठेव करावी लागली. कारण संबंधित विहिर बरेच दिवस कोरडी असल्यानं आतमध्ये विषारी वायू तयार झाला होता. गावातील एका तरुणानं विहिरीत उतरण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा श्वास गुदमरला त्यामुळे त्याला तातडीनं बाहेर यावं लागलं. यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. त्यांच्याकडेही तेवढ्या लांबची शिडी नव्हती. तसेच विहिरीतील विषारी वायूच्या भीतीनं कोणीही विहिरीत उतरण्याचा प्रयत्न केला नाही.
हेही वाचा-बुडणाऱ्या पिल्लासाठी हत्तींची धडपड; पाण्यात उडी मारत वाचवला जीव पाहा VIDEO
दैनिक भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार, बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांनी एका खाजगी कंपनीच्या व्यक्तीची मदत घेत महिलेला विहिरीतून बाहेर काढलं आहे. संबंधित व्यक्ती ऑक्सिजन मास्क परिधान करून विहिरीत उतरला होता. त्यामुळे तो महिलेला बाहेर काढू शकला. संबंधित 42 वर्षीय मृत महिलेचं नाव राजकुमारी असून त्या उत्तर प्रदेशातील कानपूर नजीक असणाऱ्या सीसामऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'बद्री प्रसाद का हाता' येथील रहिवासी आहे. राजकुमारी यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kanpur, Uttar pradesh