Home /News /national /

OMG! गेल्या 48 वर्षांत एकदाही झोपले नाही मोहनलाल; तरीही प्रकृती आहे ठणठणीत

OMG! गेल्या 48 वर्षांत एकदाही झोपले नाही मोहनलाल; तरीही प्रकृती आहे ठणठणीत

पुरेशी झोप चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. दररोज किमान 6 ते 8 तास शांत झोप (Sleep) घेणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे, असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

    भोपाळ, 30 ऑगस्ट : पुरेशी झोप चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. दररोज किमान 6 ते 8 तास शांत झोप (Sleep) घेणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे, असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. बदलती जीवनशैली, ताण-तणाव याचा आरोग्यावर (Health) विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी पुरेशी झोप घ्यावीच हे खरं असलं, तरी असेही काही लोक असतात, की ज्यांना निद्रानाशाचा सामना करावा लागतो. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एक व्यक्ती सध्या याच कारणामुळे चर्चेत आहे. ही व्यक्ती गेल्या 48 वर्षांत एक मिनिटही झोपलेली नाही. ऐकूनच कसं तरी झालं ना! पण हे खरं आहे. `दैनिक भास्कर`ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मध्य प्रदेशातल्या रिवा (Riva) येथील चाणक्यपुरी कॉलनीत राहणारे 71 वर्षांचे निवृत्त सहजिल्हाधिकारी (Joint Collector) मोहनलाल द्विवेदी (Mohanlal Dwivedi) गेल्या 48 वर्षांत एकही मिनिट झोपलेले नाहीत. निद्रानाश असूनही त्यांना यामुळे कोणताही त्रास झालेला नाही. त्यांची दिनचर्यादेखील (Daily Routine) सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नी आणि मुलगीदेखील केवळ दोनच तास झोपतात. झोप हा दिनचर्येचा एक भाग आहे. असा विकार असतानाही मोहनलाल यांचं आरोग्य गेल्या अनेक वर्षांपासून चांगलं कसं आहे, असा प्रश्न पडतो. त्यामुळे त्यांच्या या स्थितीवर विश्वास बसत नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. याबाबत संजय गांधी रुग्णालयाचे सीएमओ डॉ. यत्नेश त्रिपाठी म्हणाले, की खरं तर असं होऊ शकत नाही. हा संशोधनाचा विषय आहे. एखादी व्यक्ती 48 वर्षं न झोपता जिवंत कशी राहू शकते, हा प्रश्नच आहे. यावर 'डॉक्टरांनी एक दिवस माझ्यासोबत राहावं, म्हणजे माझी समस्या त्यांच्या लक्षात येईल,' असं उत्तर मोहनलाल यांनी दिलं. हे ही वाचा-वैतागू नका, घाम येणं आहे चांगलं! आरोग्यासाठी मिळतात अविश्वासनीय फायदे श्याम शाह मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. मनोज इंदुलकर म्हणाले, की मनात (Mind) झोपेचं एक केंद्र असतं. तेथून स्रवणाऱ्या हॉर्मोनमध्ये घट झाल्यास अशी स्थिती निर्माण होते. यामुळे निद्रानाशाचा विकार वाढण्याची शक्यता असते. यात काही आनुवंशिकता असण्याचीही शक्यता आहे. मोहनलाल म्हणतात, 'मी लहानपणी केवळ 2 ते 3 तास झोपत असे. माझे वडीलदेखील 2 ते 3 तासच झोप घेत. माझा जन्म 1 जुलै 1950 रोजी त्योंथर विभागातल्या जनकहाई गावात झाला. गावात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मी रिवा येथे स्थायिक झालो. 1970 मध्ये माझा विवाह झाला. मला प्रतिभा नावाची मुलगी असून, ती दोन्ही हातांनी सफाईदारपणे लिखाण करू शकते. प्रतिभाला एक मुलगी असून, तिचे पती सीधी येथे अभियंता आहेत.' '1973 मध्ये मला लेक्चरर म्हणून नोकरी लागली आणि त्यानंतर काही दिवसांत म्हणजेच जुलैमध्ये माझी झोप गायब झाली. त्यानंतर लेक्चररची सरकारी नोकरी सोडून मी रिवा येथील टीआरएस कॉलेजमध्ये करारावर प्राध्यापक म्हणून काम करू लागलो. 1974 मध्ये एमपीएससी पास झालो. सिवनी जिल्ह्यातील लखनादौन येथे नायब तहसीलदार म्हणून रुजू झालो. 1990 मध्ये तहसीलदार, 1995 मध्ये एसडीएम, 2001मध्ये सह जिल्हाधिकारी झालो आणि मग निवृत्त झालो,' असं मोहनलाल यांनी सांगितलं. 'जेव्हा माझी पन्ना येथे बदली झाली, तेव्हा सहजिल्हाधिकारी रात्रीचे झोपत का नाहीत, हे समजण्यासाठी माझे सहकारी माझ्यावर गुप्तपणे पाळत ठेवत. पन्नानंतर सीधी जिल्ह्यातही असाच प्रकार होत असे. झोप येत नसल्याने मी प्रशासकीय सेवा उत्तम बजावू शकलो. मी कोणतंही काम पेंडिंग ठेवत नसे,' असं मोहनलाल सांगतात. 'एकदा मी टीव्ही पाहत होतो. तेव्हा कॅलिफोर्नियातल्या 4 वर्षांच्या एका मुलाला अशीच समस्या असल्याचं मला समजलं. त्यामुळे आमची समस्या फार मोठी नाही, हे कळलं,' असं ते सांगतात. 'माझ्या या समस्येविषयी आधी मी घरात कोणालाही सांगितलं नव्हतं. रात्रीच्या वेळी शांतपणे अंथरुणात पडून राही. याचा कोणताही परिणाम माझ्या आरोग्यावर झाला नाही. शेवटी मी घरातल्या व्यक्तींना ही समस्या सांगितली. त्यानंतर अनेक प्रकारे उपचार केले. शेवटी आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला. दोन ते तीन वर्षे मुंबई, दिल्लीतली हॉस्पिटल्स, सीधी आणि रिवा येथील मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार घेतले. डॉक्टरांनी सर्व प्रकारे तपासणी केली. परंतु, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले. 2002 पर्यंत मी डॉक्टरांकडे जात होतो. परंतु, निष्पन्न काहीच झालं नाही,' असंही त्यांनी सांगितलं.

    First published:

    Tags: Health, Madhya pradesh, Sleep

    पुढील बातम्या