बिश्केक, 13 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी किरगिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये संवाद साधला. या चर्चेत महत्त्वाचा मुद्दा पाकिस्तानचाच होता. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही, असं मोदींनी जिनपिंग यांना ठामपणे सांगितलं.
पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तान एकटा पडला होता. चीनने मात्र पाकिस्तानची पाठराखण केली होती. याच कारणांमुळे शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानबदद्लच्या भूमिकेचे स्पष्ट संकेत दिले.
दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर विरोध होत असला तरी चीन मात्र पाकला पाठिशी घालतो आहे. त्यामुळेच या दोन देशांमधली जवळीक रोखणं हे भारतासमोर मोठं आव्हान आहे.
चीन- पाकिस्तानची मैत्री रोखण्याचं आव्हान
भारत आणि अमेरिकेच्या वाढत्या मैत्रीवर रशिया नाराज होणं साहजिक आहे पण तरीही रशियाच्या मदतीने चीन आणि पाकिस्तान यांची जवळीक रोखण्याचा भारताचा प्रयत्न आहे. बिश्केकला जाण्यासाठी मोदींनी पाकिस्तानच्या ऐवजी ओमानचा मार्ग निवडला आणि बिश्केक परिषदेच्या आधीच पाकिस्तानबदद्ल ठोस भूमिका घेतली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केल्यानंतर मोदी आता रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांचीही भेट घेणार आहेत.
काय आहे SCO ?
SCO म्हणजेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन हा युरोप आणि आशियामधल्या देशांचा आर्थिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेला एक गट आहे. मागच्या वर्षी झालेल्या बैठकीत दहशतवाद संपवण्यासाठी काय पावलं उचलता येतील यावर चर्चा झाली होती. त्यामुळेच भारताने या व्यासपीठावर पुन्हा एकदा दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
===============================================================================================
VIDEO : मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना पावसाळ्याची भेट, महत्त्वाच्या 18 बातम्या